लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पोलिसांना दिलेली एस्कॉर्ट व्हॅन काढून घेण्यात आली होती. तसेच अंगरक्षकाची संख्याही कमी होती. त्याचा फायदा शिवसैनिकांनी उठविला व  मारहाणीची घटना घडली.
शिवसेनेला सोडून खासदार वाकचौरे हे काँग्रेस पक्षात जाणार असल्याचे समजताच पोलिसांनी स्वत:च वाकचौरे यांच्या बंदोबस्तात वाढ केली होती. वाकचौरे यांनी काँग्रेस प्रवेशाची मुंबईत घोषणा केल्यानंतर पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी त्यांना एस्कॉर्ट व्हॅन बंदोबस्तासाठी दिली होती. त्यामध्ये पाच पोलीस कर्मचारी असत. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होऊ शकला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत शहरात झालेल्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या वेळी शिवसेना, भाजप व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. या वेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. कार्यक्रमाला कुठलेही गालबोट पोलिसांनी लागू दिले नाही. प्रचंड बंदोबस्तात कार्यक्रम पार पडला. या वेळी जे कमावले ते संगमनेरच्या मारहाणीच्या घटनेमुळे पोलिसांनी गमावले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खासदार वाकचौरे यांच्या वाहनासोबत बंदोबस्तासाठी दिलेली एस्कॉर्ट व्हॅन पोलिसांनी काढून घेतली. केवळ दोन अंगरक्षक देण्यात आले होते. संगमनेर पोलिसांनी योग्य दक्षता न घेतल्याने मारहाणीची घटना झाली. वाकचौरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. तेथेच शिवसेनेचेही कार्यालय आहे, तरीही पोलिसांनी पुरेशी दक्षता घेतली नाही. पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाकडे या हल्याची माहिती नव्हती. शिवसैनिक वाकचौरे यांच्यावर हल्ला करणार हे लोकांमध्येही बोलले जात होते. पण पोलिसांना ते कळले नाही. वाकचौरे यांच्यासोबत दोन अंगरक्षक, दोन पोलीस होते. घटना घडली तेव्हा एक पोलीस अधिकारीही आले होते. पण हल्लेखोरांचा प्रतिकार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले नाही. आता या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
वाकचौरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसजनांकडून निषेध करताना सावधगिरी बाळगण्यात आली. त्यावर तीव्र प्रतिक्रिया न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अन्य नेत्यांवर यापूर्वी हल्ले झाले तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. पण या वेळी मात्र तशी प्रतिक्रिया दिली गेली नाही. काही नेत्यांचा मात्र त्याला अपवाद होता. त्यामुळे दलित कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्रस्थापित नेत्यांवरील हल्ल्याची जेवढी दखल पोलीस घेतात तेवढी खासदार असूनही वाकचौरे यांच्या हल्ल्याबाबत घेण्यात आली नाही.