अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ गोसावी असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलीस कर्मचाऱ्यासोबत एका अल्पवयीन तरुणालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. गोव्यात ही घटना घडली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल सिद्धार्थ गोसावी वास्को पोलीस उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत होता. पोंडा टाऊन येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

‘गुरुवारी रात्री ही घटना घडली. पीडित तरुणीला घरी सुरक्षित पोहोचवण्याचा बहाणा करत पोलीस कॉन्स्टेबल सिद्धार्थ गोसावी तिला पोंडा येथे घेऊन गेला आणि बलात्कार केला. सकाळी त्याने तिला तिच्या घरी सोडलं’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडित तरुणीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस कॉन्स्टेबल सिद्धार्थ गोसावीला अटक करण्यात आली. पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत गेल्या महिन्यात एका अल्पवयीन तरुणाने शारिरीक छळ केल्याचाही आरोप केला आहे. पोलिसांनी तरुणाची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.