पित्यासह चौघांना पोलीस कोठडी

सोलापूर : काहीही कामधंदा न करता घरात सर्वानाच त्रास देणाऱ्या स्वत:च्या तरूण मुलाचा वडिलांनी तिघा मारेकऱ्यांना सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार दक्षिण सोलापूर तालुक्यात वळसंगजवळ उजेडात आला आहे. मृताच्या वडिलांसह सर्वाना अटक करण्यात आली असून त्या सर्वाना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

सुरेश सिध्दलिंग घोंगडे (वय ६२, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) याने आपला मुलगा शैलेश (वय ३१) याचा सुपारी देऊन खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सुरेश घोंगडे याच्यासह त्याच्याकडून ज्यांनी खुनाची सुपारी घेतली होती, ते संजय ऊर्फ भोजू राठोड (वय २८, मूळ रा. मुळेगाव तांडा, दक्षिण सोलापूर सध्या रा. आशाननगर, सोलापूर), शंकर नारायण वडजे (वय ४७, रा. सेवालालनगर तांडा, ता. उत्तर सोलापूर) व राहुल चंदू राठोड (वय २८, रा. मुळेगाव तांडा) या चौघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या २९ जानेवारी रोजी सकाळी सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) गावच्या शिवारात ३५ वर्षांच्या एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन केले असता दोरीने गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार वळसंग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, मृताची ओळख पटली. मृतदेह शैलेश सुरेश घोंगडे (रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) याचा असल्याचे आढळून आले. या गुन्ह्य़ाचा तपास करताना सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण सावंत यांना, मृत शैलेश घोंगडे हा घरात सर्वानाच सतत त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून वडील सुरेश घोंगडे यांनीच महिन्यापूर्वी मुलाचा खून करण्यासाठी ओळखीच्या दोघाजणांना सुपारी दिली होती, अशी माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, उपनिरीक्षक स्वामीराव पाटील, वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिरीष मानगावे आदींनी काल गुरुवारी मृताचे वडील सुरेश घोंगडे व खुनाची सुपारी घेतलेला शंकर वडजे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला शंकर वडजे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर अधिक चौकशीत त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली.

सुरेश घोंगडे यांचा मुलगा शैलेश हा काहीही कामधंदा न करता उलट घरातील सर्वाना सातत्याने त्रास देत होता. शेतजमीन नावावर करून देण्यासाठी तो वडिलांना सतत धाकदपटशा दाखवत असे. त्यामुळे घरातील सारेजण त्याच्या त्रासाला वैतागले होते. त्यातूनच सुरेश घोंगडे यांनी आपल्या शेताशेजारील शंकर वडजे व इतर दोघांना मुलाच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यानुसार शैलेश यास उचलून एका वाहनातून सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर नेले आणि वाहनातच त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. नंतर मृतदेह एका मोटारसायकलवर मध्यभागी ठेवून दोघाजणांनी कुंभारी हद्दीत नेऊन टाकला, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली. हा गुन्हा उजेडात आणण्यासाठी गुन्हे शाखेतील हवालदार ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, राजेश गायकवाड, मनोहर माने, पोलीस नाईक सुभाष शेंडगे, आसीफ शेख, आतार आदींनी कामगिरी केली. आरोपींनी वापरलेल्या भ्रमणध्वनीचा पुरावाही महत्त्वाचा ठरला.