पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील माजी सरपंच रामलिंग रेवणसिध्द देशमुख (५५) यांच्या खूनप्रकरणाचा छडा पंढरपूर तालुका पोलिसांनी अखेर लावला असून याप्रकरणी विष्णू विठ्ठल साळुंखे (रा. वेळापूर, ता. माळशिरस) यास अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून देशमुख यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे.
रामलिंग देशमुख हे पहाटे दूध आणण्यासाठी घरातून मोटारसायकलवरून शेताकडे जात असताना वाटेत त्यांना अडवून अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांचा खून केला होता. पंढरपूर तालुका पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर देशमुख यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या विक्रीच्या व्यवहारावरून त्यांचा विष्णू साळुंखे याजबरोबर वाद झाल्याच्या बाबीकडे लक्ष गेले. देशमुख यांनी साळुंखे यास चार एकरजमीन विकली होती. परंतु त्या जमिनीवर १४ लाखांचे कर्ज होते. हे कर्ज कोणी फेडायचे, यावरून दोघांत वाद होता. हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. यातच थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यातूनच वाद उफाळून देशमुख यांचा खून झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अटक केलेल्या विष्णू साळुंखे यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप जाधव हे पुढील तपास करीत आहेत.