सोलापूर शहर उत्सवप्रिय म्हणून ओळखले जात असून, या शहरात वर्षभरात ३०पेक्षा अधिक सार्वजनिक उत्सव साजरे होतात. उत्सवात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून ध्वनिप्रदूषण वाढविणाऱ्या डॉल्बी यंत्रणेचा मुक्त वापर होतो. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून यासंदर्भात गेल्या तीन वर्षांत ठोस कारवाई न झाल्यामुळे डॉल्बीचा सुळसुळाट वरचेवर वाढत चालला असताना अखेर   शहरात रुजू झालेले नवे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी कोणत्याही उत्सवात डॉल्बी यंत्रणा वापरण्यास मज्जाव केला आहे. त्यांच्या या आदेशाचा पहिला झटका पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांना बसला आहे.
दरम्यान, अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांनी नव्या पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीचा नेमका अंदाज घेत स्वत:हून डॉल्बी यंत्रणेचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. अहल्यादेवी होळकर जयंती उत्सवापासून सुरू झालेली डॉल्बी बंदीची अंमलबजावणी इतर सर्वच उत्सवांसह इतर खासगी लग्न वरात किंवा वास्तुशांतीसारख्या कार्यक्रमांसाठीही लागू झाली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त सेनगावकर यांच्याप्रमाणेच जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे हेदेखील संवेदनशील आहेत.
नूतन पोलीस आयुक्तांनी डॉल्बीवर बंदी घालण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंती मध्यवर्ती मंडळाचे प्रमुख नगरसेवक चेतन नरोटे व शिवाजी पिसे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाची सुरुवात आमच्यापासून झाली असताना हाच नियम यापुढच्या काळात सर्वच उत्सवांसाठी प्रभावीपणे लागू करण्यात यावा. त्यासाठी पोलीस आयुक्त सेनगावकर यांनी कठोर व्हावे, अशी अपेक्षा नरोटे व पिसे यांनी व्यक्त केली. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला झुंडशाहीच्या बळावर दुसरा न्याय, असे परस्पर विसंगत चित्र दिसू नये, असे चेतन नरोटे यांनी नमूद केले.