मीरा-भाईंदरमधील पोलीस ठाण्याचा उपक्रम

जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या सुविधेसाठी  मीरा रोड येथील नया नगर पोलिसांनी फेसबुक या समाजमाध्यमाचा वापर सुरु केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संपर्क ठेवणारे नयानगर हे मीरा-भाईंदरमधील पहिलेच पोलीस ठाणे आहे.

नयानगर पोलिस ठाण्याकडून  फेसबुक या समाजमाध्यमावर  खाते सुरु करण्यात आले आहे. समाजमाध्यमांचा वापर करून मैत्रीच्या नात्याने  सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य जनतेमध्ये पोलिसांबद्दल असलेली भीती आणि गैरसमज दूर करून पोलिस यंत्रणेचे  कामकाज कशाप्रकारे केले जाते हे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न समाजमाध्यमाच्या आधारे करण्यात येणार आहे.  त्याचप्रकारे नयानगर  पोलीस ठाण्याकडून करण्यात येत असलेल्या दैनंदिन  कारवाया आणि विविध उपक्रमांची माहिती जास्तीतजास्त जनतेपर्यंत पोहचवण्याकरिता  समाजमाध्यमांचा वापर करण्यात येणार आहेच शिवाय प्रसारमाध्यमांना देखील या फेसबुकशी जोडण्यात येत असून माध्यम प्रतिनिधींना पोलीस ठाण्यात दाखल होत असलेल्या गुन्ह्यंची माहिती फेसबुकद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आता पर्यंत नागरिक  नया नगर पोलिस ठाण्याशी  फेसबुकच्या माध्यमातून जोडले गेले आहेत.

मुंबई लगत असलेल्या  मीरा-भाईंदर परिसरातील लोकसंख्या १५ लाखांच्या घरात आहे.  याठिकाणी दोन  उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयासह  सहा  पोलिस ठाण्यांचा समावेश  आहे.  शहरातील कायदा व सुव्यवस्था  अखंडित राहण्याकरिता पोलिस विभागाकडून  सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्यात येतात.  समाजमाध्यमांची वाढती लोकप्रियत लक्षात घेऊन नयानगर पोलिस ठाण्याकडून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.