सोलापूर : माढा तालुक्यातील सुर्ली येथे चेष्टामस्करीतून लपवून ठेवलेल्या मोबाइलप्रकरणी शेतमालकाकडे तक्रार करण्याची धमकी देणाऱ्या एका वृद्ध शेतमजूर महिलेचा तीक्ष्ण हत्याराने मारून खून केल्याप्रकरणी एका तरूणाविरूध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

द्वारकाबाई विठ्ठल चव्हाण (वय ६२, रा. सुर्ली) असे खून झालेल्या वृद्ध महिला शेतमजुराचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा दादासाहेब कांबळे (वय २०, रा. सुर्ली) या त्याच ठिकाणी काम करणाऱ्या शेतमजुराचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे. याबाबत मृत द्वारकाबाई हिचा मुलगा मुकुंद चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार मृत द्वारकाबाई ही सुर्ली येथे समाधान सरडे यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करीत होती. याच शेतात आरोपी कृष्णा कांबळे हादेखील शेतमजूर म्हणून काम करीत असे. त्याने द्वारकाबाई हिचा मोबाइल संच तिच्या न कळत गुपचूपपणे लपवून ठेवला होता. ही माहिती उघड झाल्यानंतर रागावलेल्या द्वारकाबाईने शेतमालक समाधान सरडे यांच्याकडे तक्रार करण्याची धमकी दिली. तिने खरोखरच तक्रार केली तर आपली बदनामी होईल, असे त्याला वाटले. द्वारकाबाई ही शेतमालकाकडे तक्रार करण्यासाठी जात असताना कृष्णा कांबळे याने वाटेत द्वारकाबाईला अडविले व ती ऐकत नसल्याचे पाहून संतापलेल्या कृष्णाने तिच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने जोरदार प्रहार केला. यात ती जागीच मृत्युमुखी पडली.

खुनाचा दुसरा प्रकार

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली पोलिसांत दिलेल्या तक्रारीच्या कारणावरून भांडण होऊन त्याचे पर्यवसान स्वत:च्या वडिलांच्या हत्येत घडले. याप्रकरणी मुलगा व सून या दोघांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथे हा प्रकार घडला. अशोक विश्वंभर शिंदे (वय ६०) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. त्याचा मुलगा सिकंदर शिंदे व सून राणी यांनी रागाच्या भरात हे कृत्य केले. मोहोळ पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे. शिंदे कुटुंबीय हे पारधी जमातीचे आहेत. काही महिन्यांपूर्वी राणी शिंदे हिने जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी पोलिसांत काही जणांविरूध्द फिर्याद नोंदविली होती. ही फिर्याद दाखल केल्याने तिचा सासरा अशोक शिंदे हा रागावला होता. त्यातूनच झालेल्या भांडणातून त्याचा खून झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.