राज्यातील शेतकऱ्यांचा संप काल मिटला असताना नाशिकमध्ये मात्र परिस्थिती चिघळली असल्याचे चित्र आहे. नाशिकमधील शेतमाल गुजरातमध्ये पाठविला जात असल्याच्या कारणावरुन संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज नाशिकमध्ये गोंधळ घातला. जमावाला पांगविण्यासाठी आलेल्या पोलिसांना शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार करत हवेत गोळीबार करावा लागला. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे परिस्थिती आणखी चिघळली. दगडफेकीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून काही वेळात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, फळे आणि अन्य शेतमालाची वाहतूक होत असल्याच्या कारणावरुन नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतमाल मालमोटारीमधून रस्त्यावर फेकून दिला. दळवट याठिकाणी टोमटो आणि कांद्यासह अन्य माल फेकून देण्यात आला. यावेळी फाट्यावर जमा झालेल्या २५० ते ३०० ग्रामस्थांनी रस्त्यातील वाहने अडवत गोंधळ घालण्यास सुरवात केली. या घटनेची माहिती मिळताच अभोणा पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी उपस्थित शेतकऱ्यांना वाहने मार्गस्थ करण्याबाबत विनंती केली. मात्र संतप्त शेतकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांच्यात आणि पोलिसांत बाचाबाची झाली. जमावाने पोलिसांवर आणि त्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत हवेत गोळीबार केला. शेतकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही तणावपूर्ण परिस्थिती पोलिसांनी काही काळानंतर नियंत्रणात आणली. याप्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पोलीस कर्मचारी काल रात्रीपासून घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
याचवेळी नाशिकमधील कळवणजवळील दिंडोरी तालुक्यातील पाडाणे येथे घडलेल्या दुसऱ्या घटनेत शेतकऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर टाकून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याठिकाणीही संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जमाव पांगला. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, पोलीस जिल्हाप्रमुख अंकुश शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती जाणून घेतली आणि गोंधळ घालणाऱ्या शेतकर्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपासून येथील आदिवासी भागात सुरू असलेल्या संपाने कळवणमधील काही भागात हिंसक वळण घेतले आहे. पोलीस घटनास्थळी असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2017 11:39 am