जालना :  एटीएममधून पैशांची चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी परभणीतील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी दुपारी हवेत गोळीबार केल्याची चर्चा भोकरदन शहरात दिवसभर सुरू होती. भोकरदन-जाफराबाद या मार्गावर घडलेल्या या घटनेनंतर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिवार व त्यांचे पथक औरंगाबाद येथे विविध ठिकाणाहून एटीएम मशीनची अफरातफरी करून नागरिकांच्या खात्यावरील पैसे काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा शोध घेण्यासाठी दाखल झाले होते. मात्र दुपारी टोळी सिल्लोडकडे रवाना झाल्याचे समजताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. टोळी भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. टोळीची पांढऱ्या रंगाची कार चौकात थांबली होती. मात्र, त्यांना पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर टोळीची कार जाफराबाद पुलाच्या दिशेने निघाली. पोलिसांनी पाठलाग केला. टोळीला पकडण्यासाठी त्यांच्या चारचाकी वाहनाच्या टायरच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, निशाणा चुकला. गोळीबाराच्या आवाजाने नागरिकांची पळापळ सुरू झाली. अनेकांनी जाफराबाद मार्गावर नेमका प्रकार बघण्यासाठी गर्दी केली. या वेळी केळणा नदी वरील जाफराबाद पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती.