07 April 2020

News Flash

नक्षलवाद संपवण्याचे पथकांपुढे आव्हान

सी-६० पथकाची निर्मिती झाली तेव्हापासून या पथकाने २३० नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळविले आहे.

रवींद्र जुनारकर, कुरखेडा

नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने दोन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. यामध्ये सी-६० व शीघ्र कृती दल (क्यूआरटी) अशी दोन पथके आहेत. यातील कुरखेडा येथील शक्तिशाली भूसुरुंग स्फोटात शीघ्र कृती दल पथकातील पोलीस जवान नक्षलवाद्यांच्या सापळय़ात अडकले आणि शहीद झाले.

गडचिरोली जिल्हय़ात १९८०मध्ये नक्षलवादी चळवळ दाखल झाली. १९८०-९०च्या दशकात नक्षलवाद्यांची  या भागात  दहशत होती. जाळपोळ, हत्या आणि हिंसाचार व रक्तपातामध्ये हा जिल्हा होरपळून निघाला. त्याचा परिणाम नक्षल कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी १ डिसेंबर १९९० साली तत्कालीन पोलीस अधीक्षक के.पी. रघुवंशी यांनी सी-६० पथकाची स्थापना केली. सी-६० पथकाचे मुख्यालय हे गडचिरोली व आलापल्ली प्राणहिता उपपोलीस अधीक्षक कार्यालयात आहे.

सी-६० पथकात विशेष प्रशिक्षित कमांडो कार्यरत आहेत. पोलीस निरीक्षक एस.व्ही.गुजर हे सी-६०चे पहिले प्रभारी अधिकारी होते. गडचिरोली जिल्हा हा उत्तर व दक्षिण विभागात विभागला गेला आहे. दक्षिण भागात नक्षल कारवाया मोठय़ा प्रमाणात असल्याने प्राणहिता उपमुख्यालय १९९४ साली निर्माण करून सी-६०चे दुसरे मुख्यालय स्थापन केले. सी-६०चा प्रत्येक कमांडो हा नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी नक्षलविरोधात विशेष शोध मोहीम राबवीत असतो. सी-६०ची एकूण २४ पथके कार्यरत असून ९०० कमांडो या पथकात सक्रिय आहेत. नक्षलवाद्यांविरुद्ध कोंबिंग ऑपरेशन राबविण्यासाठी सी-६० पथकाचे कमांडो तरबेज आहेत. सी-६० पथकाची निर्मिती झाली तेव्हापासून या पथकाने २३० नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळविले आहे. तसेच शीघ्र कृती दल (क्यूआरटी)आहे. क्यूआरटी पथक हे गडचिरोली जिल्हय़ातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. नक्षलवाद्यांचा हल्ला झाला किंवा एखादी घटना झाली, तर पोलीस ठाण्यात तैनात क्यूआरटी पथक ताबडतोब घटनास्थळी दाखल होत असते. विशेष म्हणजे तात्काळ घटनास्थळी कसे पोहचायचे याचे प्रशिक्षण या पथकाला देण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हय़ातील बहुतांश भाग हा जंगली व डोंगराळ प्रदेशाचा आहे. अशा ठिकाणी नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले भूसुरुंग किंवा विस्फोटके पार करीत घटनास्थळी पोहचण्यात या पथकाचा हातखंडा आहे. त्यामुळेच या पथकाला प्रत्येक पोलीस ठाण्यात कर्तव्यावर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पथकात गडचिरोलीतील स्थानिक पोलीस शिपायांसह बाहेर जिल्हय़ातील शिपायांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. याउलट सी-६० पथकात स्थानिक पोलिसांनाच प्राधान्य देण्यात आले आहे.

उत्तर गडचिरोली विभागाकडे पोलिसांचे दुर्लक्ष

गडचिरोली जिल्हा हा दक्षिण व उत्तर अशा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण गडचिरोलीतील धानोरा, अहेरी, भामरागड, सिरोंचा व एटापल्ली या तालुक्यांमध्ये नक्षलवाद्यांचा उग्र हिंसाचार आहे. येथे नक्षलवादी चळवळ मोठय़ा प्रमाणात सक्रिय आहे. त्या तुलनेत उत्तर गडचिरोलीतील कोरची, पुराडा, कुरखेडा, वडसा व आरमोरी या भागात नक्षलवादी चळवळ त्या प्रमाणात प्रभावी नाही. कोरची या तालुक्यातील नक्षली घटना सोडल्या तर इतर तालुक्यांमध्ये नक्षलींचा तितकासा प्रभाव राहिलेला नाही. त्यामुळे उत्तर गडचिरोलीकडे पोलीस दलाचे काही प्रमाणात का होईना दुर्लक्ष झाले. किंबहुना पोलीस निर्धास्त झाले होते. नेमका त्याचाच फायदा नक्षलवाद्यांनी आज घेतला. मागील काही दिवसांपासून नक्षलवाद्यांनी उत्तर गडचिरोलीवर लक्ष केंद्रित केले होते. या भागात बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती. छोटय़ा मोठय़ा घटनांमधून नक्षलवाद्यांनी ते दाखवून दिले होते. परंतु पोलिसांचे संपूर्ण लक्ष्य हे दक्षिण गडचिरोलीत होते. हीच संधी साधून नक्षलवाद्यांनी आज शक्तिशाली भूसुरुंग स्फोट घडवून आणला. विशेष म्हणजे या स्फोटाच्या वेळी २०० नक्षलवादी त्याच परिसरात होते अशी माहिती आहे. नक्षलवादी हे पोलिसांचे वाहन लवकर ओळखतात. त्यामुळे नक्षलवादग्रस्त भागात पोलिसांनी वाहनांचा वापर करू नये, जवानांनी वाहनाने फिरू नये, नक्षल मोहीम पायदळ राबवावी असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र पोलीस खासगी वाहनांचा उपयोग करतात याची माहिती नक्षलवाद्यांना होती. नेमके तसेच झाले. जलद प्रतिसाद पथकातील पोलिसांनी आज खासगी वाहनाचा उपयोग केला. नेमकी हीच संधी नक्षलवाद्यांनी साधली आणि भूसुरुंग स्फोटाच्या सापळय़ात पोलीस अलगद अडकले आणि तिथेच हा घात झाला.

* लोकसभा निवडणुका जाहीर होताच ५ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी दुर्गम व अतिदुर्गम भागात पोस्टर, बॅनर लावून निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते.

* लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला नक्षलवाद्यांनी १० एप्रिल रोजी मतदान पथकावर हल्ला केला होता. सुदैवाने पोलीस पथकाने हल्ला परतवून लावला. याच वेळी गट्टा-जांभिया गावात नक्षलवाद्यांनी असाच स्फोट घडवून आणला. यात एक पोलीस जवान जखमी झाला.

* लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना एटापल्ली तालुक्यातील कसनसूर उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघेझरी येथील जुन्या मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगस्फोट घडवून आणला.

* लोकसभा निवडणुकीच्या दिवशी ११ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी एकूण तीन हल्ले केले. यात परसलगोंदी येथील हल्ल्यात दोन सी-६० पोलीस जवान जखमी झाले. त्याचा परिणाम एटापल्ली तालुक्यातील चार मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घ्यावे लागले.

* २५ एप्रिल रोजी दीपक ऊर्फ मंगलू सुकलू बोगामी व मोती ऊर्फ राधा झुरू मज्जी या नक्षल दाम्पत्याने पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्या समोर आत्मसमर्पण केले.

* २७ एप्रिल रोजी नक्षलविरोधी अभियान राबविताना रामको ऊर्फ कमला मनकू नरोटे व शिल्पा ऊर्फ कोटे ऊर्फ मनु दसरू दुर्वा या दोन महिला नक्षलींना ठार करण्यात यश आले.

छिन्नविच्छिन्न मृतदेह

नक्षलवाद्यांनी  घडवून आणलेला भूसुरुंग स्फोट इतका शक्तिशाली होता की १५ पोलीस जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते. घटनास्थळावर रक्तामासाचा सडा पडलेला होता.पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचताच तेथील परिस्थिती बघून पोलीस दलही हादरून गेले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2019 3:15 am

Web Title: police force face big challenge end naxalism in gadchiroli
Next Stories
1 कोकणातील पर्यटनाला जलवाहतुकीचा सेतू
2 असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पातील बँक हमीची अट शिथिल
3 मालेगावचा मतदान टक्का घसरण्यामागे राजकीय षडयंत्र
Just Now!
X