सातारा पोलीस मुख्यालयामधील २५ पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळून आल्याने संपूर्ण मुख्यालयाच्या परिसराचे आज निर्जंतुकीकरण करण्यात आले. पोलीस मुख्यालयासह जिल्ह्याच्या २९ पोलीस ठाण्यातील १२० कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोना तपासणी करून घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

गणेशोत्सव आणि मोहरम हे सण निर्विघ्नपणे पार पाडण्याचे सातारा पोलिसांचे नियोजन आहे. मार्च महिन्यापासून टाळेबंदी, शिथिलता, कायदा सुव्यवस्था व करोना संसर्ग वाढू नये म्हणून रस्त्यावर ऊन-पावसात उभे रहात संसर्ग व गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पेलले. या महिन्याभरात अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक करोनाबाधित झाले आहेत. वाई आणि रहिमतपूर येथील कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे सध्या पोलिस दल भीतीच्या वातावरणात आहे.

करोना संसर्गामध्ये सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये एकही पोलीस कर्मचारी अधिकारी बाधित झाले नव्हते. या दोन महिन्यांत मात्र सातारा मुख्यालयासह सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे. १ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ११ पोलीस ठाण्यांमध्ये ४९ बाधित आढळून आले होते. आज अखेर सातारा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात करोनाबाधित झाले आहेत. या पोलीस ठाण्यांमध्ये शिरवळ, वाई, भुईज, कराड शहर, कोयनानगर, महाबळेश्वर, मेढा, पाटण, सातारा तालुका, सातारा पोलीस उपविभागीय कार्यालय, सातारा शहर पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय, शाहपुरी पोलिस ठाणे, फलटण शहर, तळबीड, ढेबेवाडी, पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष, म्हसवड, मोटार वाहन विभाग, कोरेगाव, बोरगाव, पाचगणी, कराड वाहतूक, सातारा शहर वाहतूक, रहिमतपूर, वडूज यांचा समावेश आहे. तर बहुतेक पोलीस ठाण्यातील कर्मचारी बाधित होत असताना लोणंद, कराड तालुका, पुसेगाव, औंध, उंब्रज, वाठार, दहिवडी ही पोलिस ठाणी अजूनही सुरक्षित आहेत.

पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्वच पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना करोना तपासणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी राजपथावरील पोलीस करमणूक केंद्रात विलीगीकरण कक्ष उभारला आहे. पोलिसांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

तीन हजार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना तपासणीचे आदेश

गणेशोत्सव आणि इतर कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील तीन हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची करोना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये १२० बाधीत आढळून आले असून ७० जण उपचार घेत आहेत. पोलीस मुख्यल्यातील २५ कर्मचारी बाधित आहेत. पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सातारा, कराड, फलटण, पोलीस करमणूक केंद्र सातारा येथे स्वतंत्र चांगली व्यवस्था केली आहे. पोलीस प्रशासनाकडून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चांगली काळजी घेण्यात येत आहे. सध्याच्या बाधीत कर्मचाऱ्यांमध्ये कोणाचीही गंभीर प्रकृती नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.