गुन्हेगारीला वचक बसावा, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस कार्यरत असतात. मात्र काही पोलीस कायदा धाब्यावर बसवून आणि आपल्या पदाचा गैरवापरत करताना दिसतात. औरंगाबादच्या बेगमपुरा भागात किराणा दुकान मालकाकडून लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक वसीम हाश्मी यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने गुरुवारी रात्री ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

बेगमपुरा भागात असलेल्या दुकानदारासंदर्भातील एका प्रकरणाचा तपास करून गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या प्रकरणात वसीम हाश्मी यांनी दुकानदाराला पोलीस ठाण्यात बोलावले. तुझ्याविरोधात गुन्हा दाखल करायचा आहे अशी भीती घालून तो दाखल करायचा नसेल तर ४० हजार रुपये दे अशी मागणी केली. यानंतर या दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधला. गुरुवारी रात्री बेगमपुरा ठाण्यात पथकाच्या वतीने सापळा रचण्यात आला आणि पोलीस निरीक्षकाला ३५ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली.