06 March 2021

News Flash

पोलीस निरीक्षक निलंबित, मुख्य सूत्रधार फरारच

पोलीस शिपायाच्या हत्येच्या तपासात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित लकडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

| February 9, 2015 03:45 am

पोलीस शिपायाच्या हत्येच्या तपासात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित लकडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, हत्या झालेल्या दीपक कोलते यांच्या कुटुंबीयांची पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज, रविवारी भेट घेऊन सांत्वन केले. या भेटीच्या पार्श्र्वभूमीवरच निलंबनाचे आदेश काढण्यात आले. पोलिसांनी एकाला अटक केली असली तरी अद्याप खुनातील प्रमुख सूत्रधारासह इतर आरोपी फरारच आहेत. अटक केलेल्या आरोपीला आज १२ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
दरम्यान, शेवगाव पोलीस ठाण्यात शिर्डीच्या वाहतूक शाखेचे निरीक्षक संपत भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज पदाची सूत्रे स्वीकारली. आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी काल बालमटाकळी येथे बंद पाळण्यात आला तर माळीबाभुळगावच्या ग्रामस्थांनी बुधवारी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या मंगळवारी पोलीस शिपाई कोलते यांची हत्या करण्यात आली. यासंदर्भात कुख्यात गुन्हेगार पिन्या ऊर्फ सुरेश कापसे, बप्पा विघ्ने व संतोष कल्याण बोबडे आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संतोषला (२४, धनगाव पैठण, औरंगाबाद) काल रात्री अटक करण्यात आली. त्याला १२ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज दिला. संतोष याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला आैरंगाबाद जिल्ह्य़ातून तडीपार करण्यात आलेले आहे. मात्र मुख्य सूत्रधार पिन्या कापसे व इतर आरोपी अद्याप फरारच आहेत. त्याचा शोध पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके घेत आहेत.
शेवगावचे निरीक्षक लकडे यांचा पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांवर नियंत्रण नाही, हद्दीत अवैध व्यवसाय तेजीत सुरू असल्यामुळे त्यांची पूर्वीच चौकशी सुरू होती, त्याचा अहवालही प्राप्त झाला होता. मात्र पालकमंत्री शिंदे यांनी कोलते कुटुंबीयांची भेट सहा दिवसांनंतर घेण्याचा निर्णय काल घेतल्याच्या पार्श्र्वभूमीवर लगेचच वातावरण शांत करण्यासाठी लकडे यांना निलंबित करण्याचा निर्णय झाल्याचे समजले.
शिंदे यांनी आज माळीबाभुळगाव येथे जाऊन कोलते कुटुंबीयांचे सांत्वन केले. दीपक यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी देण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच तिला वयाच्या ५८व्या वर्षांपर्यंत निवृत्तिवेतन देण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. या वेळी आ. मोनिका राजळे, जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2015 3:45 am

Web Title: police inspector suspendedmain accused absconding
टॅग : Police Inspector
Next Stories
1 रंकाळा तटबंदीचा भाग कोसळला
2 आधारकार्डासाठी रास्ता रोको
3 शाळा प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने २५ टक्के आरक्षित जागांचा प्रश्न
Just Now!
X