कराडनजीकच्या जखिणवाडी येथे काल सोमवारी मयूर मोहन गोरे या तेहतीस वर्षीय तरुणाचा डोक्यात खोरे घालून तसेच, कोयत्याने वार करीत नंतर गोळय़ा झाडून करण्यात आलेल्या हत्येप्रकरणी कसून चौकशी होताना तपासात प्रगती असून, मारेकरी पोलिसांच्या टप्प्यात असल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांकडून ठोस कारवाईची माहिती मिळू शकली नाही.
मयूर गोरे या येथील पंतचा कोट परिसरातील तरुणास काल अनोळखी व्यक्तींनी बँकेत खाते उघडण्याची बतावणी करून महामार्गावरील जखिणवाडी येथे बोलावून घेतले होते. मयूर मावसभावासमवेत तेथे गेला असता, चौघा अज्ञातांनी त्याची भरदिवसा निर्घृण हत्या केली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन तपासकामी उचित सूचना केल्या. या प्रकरणी पोलिसांची चार पथके कार्यरत आहेत.