06 April 2020

News Flash

फिर्यादी व आरोपीसह पोलीस औरंगाबादेत, किडनी तस्करी प्रकरण

तेथील एका मोठय़ा रुग्णालयात किडनी काढण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणी तपासाला वेग आला असून सखोल तपासासाठी अकोला पोलिसांचे एक पथक आज, शनिवारी औरंगाबाद येथे फिर्यादी व आरोपीला घेऊन रवाना झाले आहे.

राज्यभर गाजत असलेल्या किडनी तस्करी प्रकरणाचा व्यापक तपास करण्यासाठी अकोला पोलिसांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी तपास करीत आहेत. पोलीस कोठडीतील आरोपींना घेऊन पोलीस पथक सांगली व मांडवा येथे तपास करीत आहेत. मुख्य सूत्रधार शिवाजी कोळीला घेऊन पोलीस पथकाने नागपूरमध्ये तपास केला. त्यानंतर कोळीला घेऊन पोलिसांचे एक पथक सांगली जिल्ह्य़ात गेले. दुसरे पथक आरोपी विनोद पवारला घेऊन बुलढाणा जिल्ह्य़ातील मांडवा येथे गेले होते. तेथे पोलिसांना काही धागेदोरे गवसल्याची माहिती आहे. आज पोलिसांचे एक पथक आरोपी विनोद पवार व फिर्यादी शांताबाई खरात यांना घेऊन औरंगाबाद येथे रवाना झाले आहे. तेथील एका मोठय़ा रुग्णालयात किडनी काढण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्याचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस पथक आज फिर्यादी व आरोपीला घेऊन औरंगाबादला रवाना झाले आहे. या प्रकरणातील वैद्यकीय समितीने आपले सर्व अहवाल पोलिसांकडे सादर केल्याची माहिती असून, कालच डाबकी रोड पोलीस ठाण्यात किडनी तस्करी प्रकरणी भादंवि कलम ३७० अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास अनेक शहरात करण्यात येत असून, या प्रकरणात अनेक मोठे डॉक्टर अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 7:12 am

Web Title: police investigate kidney smuggling case
Next Stories
1 सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव प्रदान
2 मनसेच्या नकारामुळे भाजपची माघार
3 मत बाद होणार नाही याची काळजी घ्या!
Just Now!
X