हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूरमध्ये सोमवारी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या मोर्च्यावर लाठीमार केला. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या नेतृत्त्वाखालील परिसरातील बॅरिकेड्स तोडून मोर्चा विधानभवनाकडे जात असताना पोलीसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करताना हा प्रकार घडला. दुष्काळग्रस्तांना देण्यात आलेल्या पॅकेजची रक्कम वाढवून द्यावी, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या या मोर्च्यामध्ये युवक काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. नियोजित मार्ग बदलून या मोर्च्याने अचानकपणे विधानभवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे लाठीमार केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. विश्वजित कदम यांनी सरकारवर सत्तेचा दुरूपयोग केल्याचा आरोप करताना आपण फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसदर्भात सरकारला निवेदन देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र, पोलीसांनी आपल्याला विनाकारण अडवून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या लाठीमारात युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.