दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून दीड लाखाची रक्कम काढून घेतली व नंतर पोलीस छापा घातल्याचा बनाव करून एका व्यापाऱ्याला फसविल्याप्रकरणी पाच पोलिसांसह नऊ जणांविरुद्ध सोलापुरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्य़ात अडकलेले पोलीस कर्मचारी हे २६ ते ४० वर्षांच्या वयोगटातील आहेत.
महिबूब इस्माईल रड्डे (३१, मूळ रा. आलूर, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद, सध्या रा. जोशी गल्ली, बाळे, सोलापूर) या फसले गेलेल्या व्यापाऱ्याने यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार सुदीप रमेश काळे (३०, नेमणूक विजापूर नाका पोलीस ठाणे), सोमनाथ दत्ता काळे (२६, नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे),सुरेंद्र दत्ता काळे (३०) व महिबूब मुस्तफा शेख (४०, दोघांची नेमणूक शहर पोलीस मुख्यालय) तसेच अन्य एक अनोळखी पोलीस कर्मचाऱ्यासह भारत पांडुरंग जाधव (४७, रा.सुदीप कॉम्प्लेक्स, अशौक चौक, सोलापूर), आनंद रामपाल वाल्मिकी (४५, रा.  सिध्दार्थ चौक, नव महात्मा फुले नगर, सोलापूर), राम ननवरे (रा. बीबी दारफळ, ता. उत्तर सोलापूर) व अन्य एक अनोळखी व्यक्ती अशा नऊ जणांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. यापैकी पोलीस नाईक संदीप काळे व सोमनाथ काळे यांच्यासह भारत जाधव व आनंद वाल्मिकी या चौघांना सोमवारी पहाटे अटक करण्यात आली आहे.
यातील भारत जाधव हा या टोळीचा म्होरक्या असून व्यापारी व इतर मध्मयवर्गीयांना आर्थिक लाभाचे आमिष दाखवून, दामदुप्पट पैसे देण्याचा देखावा निर्माण करून लाखोंची रक्कम उकळायचा आणि ऐनवेळी पोलिसांचा छापा पडल्याचा बनाव करून संबंधिताला पळवून लावायचे आणि त्याची फसवणूक करायची, अशी या टोळीची गुन्ह्य़ाची पध्दती आहे. अशा गुन्ह्य़ात आतापर्यंत तोतया पोलिसांचा सहभाग घेतला जात असे. परंतु आता खरोखर पोलीसच सामील होत असल्याने पोलीस खाते चक्रावून गेले आहे. वर्षांपूर्वी महिबूब रड्डे याची ओळख झाल्यानंतर भारत जाधव याने त्यास दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून त्याचा विश्वास संपादन केला. पुणे रस्त्यावर बाळे येथे शिवराज बार, डी. मार्टसमोर, जुळे सोलापूर व अशोक चौकाजवळील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळील केरला मसाज सेंटर अशा विविध ठिकाणी महिबूब रड्डे याच्याकडून भारत जाधव व त्याच्या साथीदारांनी सव्वा लाखाची रक्कम उकळली. त्यावर लगेचच दामदुप्पट करून मिळण्याची हमी देताना ठरल्याप्रमाणे दामदुप्पट रक्कम देण्यासाठी बोलावून घेतले. परंतु जेव्हा रड्डे हे जाधव याच्याकडे आले तेव्हा दाम दुप्पट रक्कम देण्याचे नाटक रचत असताना त्याठिकाणी अचानकपणे पोलिसांची धाड पडली. तेव्हा जाधव व त्याच्या साथीदारांनी रड्डे यास पोलिसांची भीती दाखवून नंतर भेटण्याची थाप मारून पळवून लावले. नंतर घेतलेली रक्कम मिळण्यासाठी तगादा लावला असता रक्कम परत न देता रड्डे यांची फसवणूक करण्यात आली. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून तक्रार केली. त्यानुसार चौकशी होऊन गुन्हा नोंदविण्यात आला. यातील भारत जाधव हा पोलिसांकडील नोंदीनुसार सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यास यापूर्वी एमपीडीए कायद्याखाली स्थानबध्दही करण्यात आले होते.