जामखेडमधील दुहेरी हत्याप्रकरणात सध्यातरी राजकीय संबंध दिसत नाही, मात्र तपासात चित्र स्पष्ट होईलच. गावठी कट्टे आणि बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करीत जिल्ह्यातील वाढती गुंडगिरी आणि गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला असून, त्याबाबतची अंमलबजावणी लवकरच दिसून येईल, असे राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज, सोमवारी येथे सांगितले.

नगरच्या केडगाव उपनगरात शिवसैनिकांच्या दुहेरी हत्येनंतर लगेचच काही दिवसांत जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा कार्यकर्त्यांची शनिवारी हत्या झाली. या पाश्र्वभूमीवर नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीची राज्यपातळीवर चर्चा होऊ लागली आहे. त्याची दखल घेत गृह राज्यमंत्री केसरकर  नगरमध्ये आले होते. मात्र औरंगाबादहून नगरला आलेले केसरकर हे प्रत्यक्ष जामखेडला न जाता नगरमधूनच माहिती घेऊन ते मुंबईला परतले.

राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा, या प्रश्नावर बोलताना केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कारभारादरम्यान अनेक सकारात्मक गोष्टी केल्या आहेत, स्वतंत्र गृहमंत्र्यांच्या मुद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलले आहेत. त्यामुळे पुन्हा आपण त्यावर बोलणे उचित होणार नाही.

जामखेड येथील राष्ट्रवादीचे योगेश व राकेश राळेभात यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, काहींची नावे निष्पन्न झाली आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची १५ पथके रवाना करण्यात आली आहेत. राळेभात यांच्या हत्येशी राजकीय कनेक्शन पुढे आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

रोख बक्षीस योजना

केडगाव व जामखेड येथे लागोपाठ झालेल्या दोन दुहेरी हत्येच्या गुन्ह्य़ात गावठी कट्टय़ांचा वापर झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार  शर्मा यांनी कट्टा, विनापरवाना शस्त्रे बाळगणारे तसेच इतर अवैध व्यवसायाची माहिती देणाऱ्या नागरिकांना रोख रकमेची बक्षिसे देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यासाठी शर्मा यांच्या मोबाईलवर (८८८८३१००००) किंवा ई-मेलवर संपर्क साधण्याचे अवाहन केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. कट्टा, पिस्तूल व रिव्हॉलव्हरची माहिती देणाऱ्यास रोख २५ हजार रु., तलवार, चॉपर बाळगणारे तसेच मारामारी करणारे, गांजा, चरस, अफु, हेरॉईन यांची विक्री करणारे, कुंटणखाने चालवणारे व गुटखा, सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांसाठी प्रत्येकी ५ हजार रु. तर अवैध सावकारी, अवैध दारु, जुगार, मटका चालवणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांस प्रत्येकी रोख २ हजार रु.चे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.