एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला, त्यांचं वागणं आक्षेपार्ह होतं. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे केल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. नक्षलवादाशी संबंधित पुस्तक घरात सापडलं, म्हणजे तो गुन्हा ठरत नाही. माझ्याही घरात नक्षलवादाचं पुस्तक आहे. आम्हीही माहिती घेतो म्हणजे लगेच तो गुन्हा ठरत नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. कवितेतून विद्रोह व्यक्त करणाऱ्या नामदेव ढसाळ यांचं उदाहरणही शरद पवार यांनी दिलं. ” नामदेव ढसाळ यांचा गोलपीठा सगळ्यांनी वाचला आहे. त्यात त्यांनी असंतोष मांडला आहे. टीका केली म्हणून लगेच तो राष्ट्रद्रोह कसा होईल? अशा गोष्टींना राष्ट्रद्रोह म्हणणं चुकीचं आहे” असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच ‘रक्ताने पेटलेल्या अगणित सूर्यांनो’ या ढसाळ यांच्या कवितेचं वाचनही त्यांनी केलं.

पुण्यातील एल्गार परिषदेमुळे सामाजिक सौहार्द बिघडवल्याचा ठपका ठेवून पुणे पोलिसांनी अनेक लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर कारवाई केली. अनेकांना अटकही करण्यात आली. आजही त्यातले काही जण न्यायालयीन लढाई लढत आहेत असं म्हणत शरद पवार यांनी या कारवाईबाबतच शंका उपस्थित केली.

“विद्रोही विचारांच्या कविता वाचणं किंवा घरात नक्षलवादी साहित्य वाचणं हा काही अटकेचा आधार ठरू शकत नाही. माझ्याही घरात नक्षलवादाशी संबंधित साहित्य आहे. आम्ही माहिती घेत असतो. जे वाचन करतात त्यांच्याकडे अशी पुस्तकं असणं गैर नाही. पुस्तकं घरात आहेत म्हणून नक्षलवादी आहेत असा अर्थ होत नाही” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.