गुप्तधनाच्या लालसेतून घडले हत्याकांड, तीन आरोपी जेरबंद
गेल्या चार महिन्यांपूर्वी संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडवून देणाऱ्या ताडबोरगाव हत्याकांडाचे धागेदोरे उकलले असून याप्रकरणी तीन आरोपींना शिताफीने जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पथकाने भिकारी, शेतकरी, महाराज यांची वेषांतरे करून आरोपींचा माग काढला.
ताडबोरगाव शिवारात २ फेब्रुवारी २०१६ या दिवशी चोरटय़ांनी दोन आखाडय़ांवर सशस्त्र मारहाण करून तिघांना ठार केले होते. सूर्यभान राजाराम फुलपगारे, सुभाष गिन्यानदेव पठाडे, शांताबाई सुभाष पठाडे, या तिघांना जबर दुखापत करून चोरटय़ांनी ठार मारले होते. हे हत्याकांड गुप्तधनाच्या लालसेतून झाल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले. गेल्या आठवडय़ात (दि. ३१ मे) पहाटे चारच्या सुमारास आठ चोरटय़ांनी ताडबोरगाव शिवारात राजेंद्र पुरनमल जैन यांच्या पेट्रोल पंपावरून २० हजार किमतीचे साडेतीनशे लिटर डिझेल चोरून नेले होते. हे चोरटे डिझेल चोरून नेत असताना यातल्या दोन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले तर सहा जण अंधाराचा गरफायदा घेऊन पळून निघून गेले.
या गुन्ह्यातल्या दोन आरोपींची सखोल चौकशी करून उर्वरित सहा आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यातच ताडबोरगावच्या तिहेरी हत्याकांडाचेही धागे उकलले.
या आरोपींची चौकशी चालू असताना त्यांच्या बोलण्यात असंबद्धता आढळून आली. हे आरोपी काही तरी लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यादृष्टीने या आरोपींचा सखोल तपास करण्यात यावा व त्यांची कसून चौकशी करण्यात यावी, असे पोलीस अधीक्षक नियती ठाकर व अप्पर पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी मानवत येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक अजय बन्सल व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांना सांगितले. नितीन खंडागळे व त्यांचे पथक मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांचे पथक आदींना तसे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता ताडबोरगावच्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले.
सूर्यभान राजाराम फुलपगारे यास गुप्तधन दिसते, तसेच सूर्यभानसह सुभाष गिन्यानदेव पठाडे, शांताबाई सुभाष पठाडे या तिघांनी दोन किलो सोन्याचे गुप्तधन शोधून काढले असून हे गुप्तधन त्यांच्या आखाडय़ावर आहे, अशी माहिती चोरटय़ांना मिळाली. त्या आधारे त्यांनी फुलपगारे व पठाडे यांच्या दोन वेगवेगळ्या आखाडय़ांवर गुप्तधनासाठी हल्ला केला. गुप्तधन न मिळाल्याने या तिघांनाही जबर दुखापत करून ठार मारले अशी माहिती या दोन्ही आरोपींनी दिली.