सोलापूर : सोलापुरातील दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्य़ात नेमके किती आरोपी आहेत, याची अधिकृत माहिती पोलीस तपास अधिकाऱ्यांकडून अद्यापि दिली जात नसताना या गुन्ह्य़ात नेमके किती आरोपी आहेत, याचा स्पष्ट उलगडा होत नाही. शिवसेनेचे माजीमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी या गुन्ह्य़ात अकरा नव्हेत, तर सोळा आरोपी असल्याचा दावा केला. तर याउलट भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी सोलापुरात पीडित मुलीच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना या गुन्ह्य़ात अकरा आरोपी असल्याची माहिती दिली.

गेल्या ११ फेब्रुवारी रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात या सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असता त्याची माहिती उघड न करता पोलिसांनी अद्यापि कमालीची गोपनीयता बाळगली आहे. सुरुवातीला या गुन्ह्य़ात दहा तरुणांचा सहभाग असल्याची माहिती अनधिकृतपणे देण्यात आली होती. त्यानंतर आरोपी अकरा असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र नेमके किती आरोपी आणि त्यांची नावे आदीबाबत अधिकृत माहिती देण्यास तपास अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त प्रीति टिपरे यांनी टाळाटाळ केली आहे. गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटत असतानादेखील त्याची माहिती न देता गोपनीयता बाळगली जात आहे.

त्यामुळे आरोपी कोण? त्यांचे नातेवाईक पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि राजकारणी मंडळी असल्यामुळेच आरोपींसह गुन्ह्य़ाची कोणतीही माहिती दिली जात नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी पोलीस तपास यंत्रणेच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. या गुन्ह्य़ात आरोपींची संख्या अकरा नसून, सोळा आहे. त्यापैकी अकरा जणांविरूध्दच गुन्हा नोंद झाला आहे. त्यापैकी सात जणांना अटक झाली आहे. परंतु त्यांची नावे गुपित ठेवली जात आहेत. आरोपी म्हणून सोळा नराधमांची नावे असताना अकरा जणांवरच गुन्हा दाखल होतो कसा? उर्वरित पाच जणांना संरक्षण दिले काय, असा सवाल करीत खंदारे यांनी पोलीस तपास यंत्रणेकडून पीडित मुलीला न्याय मिळण्याची शक्यता धूसर असल्याचा आरोप केला.

तथापि, यातील पीडित मुलीसह तिच्या कुटुंबीयांची भेट घेतलेल्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी, पीडित मुलीने दिलेल्या माहितीचा हवाला देत या सामूहिक बलात्कार प्रकरणात अकरा नराधमांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. आरोपींची नावे जाहीर करावीत, किमान अटकेतील आरोपींची नावे तरी समाजासमोर येणे आवश्यक आहे. परंतु पोलिसांकडून तांत्रिक अडचण सांगितली जात असल्याचे वाघ यांनी सांगितले.

महिनाभरात न्याय हवा

सामूहिक बलात्कार प्रकरणात जलगतीने तपास होऊन महिनाभरात पीडित मुलीला न्याय मिळावा, अन्यथा पोलीस यंत्रणा व एकूणच कायद्याविषयीचा विश्वास उडून जाईल. कायदे कितीही चांगले आणि कठोर असले तरी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारी यंत्रणा तेवढीच महत्त्वाची आहे. यंत्रणा कार्यक्षम व संवेदनशील नसेल तर कायद्याचा उपयोग काय, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. पीडित मुलीला मनोधैर्य योजनेतून तातडीने आर्थिक साह्य़ मिळावे, तिच्या शिक्षणासाठी अन्य जिल्ह्य़ात सोय करता येईल काय, याचाही विचार गांभीर्याने व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.