पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावर नेमणुकीला असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला विनाकारण उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने बेदम मारहाण केली. वरिष्ठांकडून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या अरेरावीमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या बंगल्यावर सागर भास्कर तावरे हा पोलीस कर्मचारी नेमणुकीला आहे. पोलीस मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तावरे हा उभा होता. रात्री साडेदहाच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक दर्जाचा एक अधिकारी त्या ठिकाणी आला. त्याने तावरे यास, तू या ठिकाणी का उभा आहे, अशी विचारणा केली. मी सहज उभा आहे. असे सांगितले असता तावरे यास अधिकाऱ्याने व त्याच्याबरोबर असलेल्या कर्मचाऱ्याने मारहाण केली. या वेळी त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

मारहाणीच्या या घटनेनंतर तावरे यांच्या कुटुंबीयांनी फिर्याद देण्याची भूमिका घेतली. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल होऊ  दिली नाही. या घटनेची वाच्यता होऊ  नये म्हणून दक्षता घेण्यात आली. भर चौकात हा प्रकार घडल्याने शहरभर त्याची चर्चा झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तावरे व दबंग पोलीस अधिकाऱ्याला बोलावून घेतले. हे प्रकरण तडजोडीने मिटविण्याचे प्रयत्न सुरू होते.