मुंबईतील २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला पकडण्यात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर असे या अधिकाऱ्याचे नाव असून दाऊदचा जुना सहकारी सोहेल भामला याला सोडल्याच्या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.

संजय गोविलकर हे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. २६/११च्या हल्ल्यात कसाबला पकडण्यात मदत केल्यानंतर गोविलकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्यानंतर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर गोविलकर चर्चेत आले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जुना सहकारी सोहेल भामला याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो मुंबई पोलिसांच्या मोस्ट वॉण्टेडच्या यादीत असून पोलीस त्याच्या शोधात होते. दरम्यान, मागच्या आठवड्यात भामला दुबईहून मुंबईत आला होता. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी भामला आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांना दिली. गोविलकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र शिंगोटे यांनी त्याला विमानतळावरच ताब्यात घेतले होते. त्यानंतर गोविलकर, शिंगोटे यांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात प्राथमिक चौकशी करून भामला याला सोडून दिले. हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आल्यानंतर भामलाला अटक करण्याची गरज नव्हती. त्यामुळे सोडून दिले अशी माहिती दिली. याची गंभीर दखल घेत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी गोविलकर, शिंगोटे दोघांना निलंबित केले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

बनावट नोटा वाटल्याप्रकरणी भामला याला न्यायालयाने २००४ मध्ये पाच वर्ष तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणात तात्पुरता जामीन मिळाल्यानंतर भामला बेपत्ता झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. त्याचप्रमाणे जुहूतील बंगला देण्याचे सांगून एका उद्योजकाला फसविल्याच्या प्रकरणातही भामलावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटिसही जारी केलेली आहे.