सहा अटकेत, ५ पिस्तूल व ३० काडतूस हस्तगत

काही दिवसांपूर्वीच खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपातून कारागृहातून बाहेर आलेला महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद वहाब खान याच्यासह पाच जणांचा पूर्ववैमनस्यातून खुनाचा कट रचल्याची कबुली गुन्हेगार अझहर मंजूर शेख (३६, रा. सर्जेपुरा) याने दिली आहे. मुकुंदनगर भागातील कुख्यात टोळी अंडागँगशी असलेल्या वैमनस्यातून हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी कट उधळल्याने शहरातील टोळीयुद्धाला अटकाव निर्माण झाला आहे.

अझहर शेख याच्यासह ६ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ५ पिस्तुलांसह ३० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. अजहर याच्यावर खुनासह अपहरण, खंडणी आदी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या सहाही जणांना दि. १८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज, रविवारी दिला. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे (शहर) व मनीष कलवानिया (ग्रामीण) व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिलीप पवार आदी उपस्थित होते. अझहर याच्यासह सहा जणांना काल, शनिवारी रात्री शहरातील तपोवन रस्त्यावरील भिस्तबाग परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरुन प्रारंभी अटक केली. औरंगाबाद रस्त्यावरील पेट्रोलपंप लुटण्यासाठी ही टोळी येत असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती होती. या टोळीकडील पिस्तुले कोठुन आणले याच्या चौकशीत अझहरने समदखान याच्या खुनाच्या कटाची कबुली दिली. अजहर शेखसह सोमनाथ उत्तम दळवी (२३, रा. भिस्तबाग), गुड्ड उर्फ शहानवाज हमीद सय्यद (३७, रा. नॅशनल कॉलनी, मुकुंदनगर), सचिन कोंडीराम जाधव (२५, रा. भुषणनगर, केडगाव), हरिभाऊ धर्मेद्र सहदेव (१८, रा. गंजबाजार), सिद्धेश संदीप खरमाळे (२०, रा. भांडगाव, पारनेर) यांना अटक केली. या टोळीतील किशोर आरणे (रा. सोनेवाडी, केडगाव) हा पोलिसांसमोरहून पसार झाला. या टोळीकडून ५ गावठी पिस्तूल, ३० जिवंत काडतुसे, दोन स्वतंत्र मॅगझिन, एक मारुती कार, एक दुचाकी व ९ मोबाईल असा सुमारे ३ लाख ७७ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही टोळी पकडली. शाखेला एक टोळी औरंगाबाद रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती, तपोवन रस्त्यावर टोळीला पकडल्यानंतर शस्त्रांमुळे कटाचा उलगडा झाला. समदखानसह शहानवाज नन्हेमिया, शहा आरटीओ, सादिक अल्लाबक्ष शेख, अजिम हनिफ शेख, जुबेर बाबामिया सय्यद यांच्या खुनाचा कट रचला गेला होता.

स्फोट घडवला

अझहर हा शहरात इस्टेट एजंट म्हणून काम करतो. त्याचे अनेकांशी वाद आहेत. सासऱ्याचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सर्जेपुरा भागातून तो काही महिन्यापूर्वी शहरालगतच्या आलमगीर भागात स्थलांतरित झाला होता. त्याचे तीन विवाह झाले आहेत. तीन महिन्यापूर्वी आलमगीरमधील कत्याच्या घरात स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. स्फोटात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. तोही गंभीर भाजला होता. त्याच्या पत्नीने दिलेल्या मृत्युपूर्व जबाबात समदखान वगळता इतर पाच जणांनी घरात ड्रममधून पेट्रोल फेकले, त्याचा स्फोट होऊन मी भाजले, असे सांगितले होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, मात्र अझहरवर पाळत ठेवली होती. चौकशीत त्याने पत्नीचा स्फोट घडवून आणून खून केल्याची कबुली दिली.

अंडागँगशी वैमनस्य

नगरसेवक समदखान याची काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्य़ातून मुक्तता केल्याने कारागृहाबाहेर आला. त्याचे व मुकुंदनगरमधील अंडागँगशी वैमनस्य आहे. मात्र अंडागँगच्या प्रमुखाशी अझहर शेखची मैत्री आहे. अझहर शेख व सोमनाथ दळवी यांची कारागृहात ओळख झाली. समदखानची सुटका झाल्याने त्याच्यासह इतरांचा गेम करण्याचा निर्णय अझहरने घेतला होता. त्यासाठी मध्यप्रदेशातून पिस्तुले व काडतुसे आणली व सोमनाथ दळवी याच्याशी संपर्क केल्याचा संशय पोलिसांना वाटतो आहे.