21 September 2020

News Flash

गुटखा तस्करीत पोलीस कर्मचारी?

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस हवालदारांचे निलंबन

टाळेबंदीच्या काळात गुटख्याची पाकीटे भाजीपाला असलेल्या वाहनातून तस्करी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते. भाजीपाला घेऊून येणारे वाहन मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातीवली येथे अपघातात उलटल्याने तस्करी उघड झाली होती.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस हवालदारांचे निलंबन

बोईसर: परराज्यातून येणाऱ्या गुटखाच्या तस्करीमध्ये पोलिसांचा सहभाग उघड झाला असून पालघर पोलीस व गुटखामाफिया यांच्या समीकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे. गुटखामाफियांशी संपर्कात राहिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि मनोर पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला पोलीस महानिरीक्षक यांनी निलंबित केले आहे. गुटख्याची तस्करी करण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपयांची रक्कम घेतली जात असल्याबाबत मीरा रोड येथील गुटखामाफियाने पोलिसांच्या विरोधातच तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी असतानादेखील गुटख्याची खुलेआम विक्री केली जात असल्याचे अनेकदा उघड झाले होते. बंदी असताना गुटखा तस्करी फक्त पोलिसांच्या संगनमताने होत असल्याबाबत आरोप केले जात होते. मात्र आता गुटखामाफियानेच पोलिसांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

मीरा रोडच्या एका गुटखामाफियाने त्यास खोटय़ा गुन्ह्य़ात अडकवण्याची धमकी देऊन महिन्याकाठी लाखो रुपयांची रोख रक्कम घेतल्याचा आरोप पोलिसांवर केला केला होता. याप्रकरणी गुटखामाफियाने १४ डिसेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पालघरच्या पोलीस अधीक्षकांना तक्रार करून चौकशीची मागणी केली होती.

गुटखामाफियाच पोलिसांच्या विरोधात उभा राहिल्याने अनेक स्थानिक अधिकाऱ्यांना धडकी भरली असल्याची माहिती समोर येत आहे. गुटखामाफियांच्या तक्रारीनुसार त्याने आरोप केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून

कोकण विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर सात महिन्यांनंतर  २८ जुलै २०२० रोजी कारवाई केली आहे. मनोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सरदार महाजन आणि बोईसर स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांना निलंबित करण्यात आले असून याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती.

यापूर्वीही पाच पोलिसांचे निलंबन

* यातच याप्रकरणी अजूनही अनेक अधिकारी अडकणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत असून गुटखामाफियाने लावलेल्या आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

* गुटखामाफिया आणि पालघर पोलीस यांचे संबंध याअगोदरदेखील उघड झाले होते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात गुटखामाफियांसोबतच्या संबंधामुळे कासा, विरार आणि वालीव पोलीस स्टेशनमधील पाच कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढले होते.

* महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीर शिरकाव करणाऱ्या गुटखामाफियांचे मुख्य सूत्रधार हे पालघर पोलीस आहेत की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2020 3:04 am

Web Title: police personnel involved in gutkha smuggling zws 70
Next Stories
1 गणेशभक्तांसाठी कोकणची वाट खडतरच
2 रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढते
3 महाविकास आघाडीत कोणताही ताळमेळ नाही – राणे
Just Now!
X