18 October 2018

News Flash

औरंगाबादच्या प्रोझोन मॉलमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या विदेशी तरूणी ताब्यात

वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली थायलँड येथील असल्याची प्रथमदर्शनी माहिती

औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलवर धाड

औरंगाबाद शहरातील सिडको भागात असलेल्या प्रोझोन मॉलवर धाड टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या विदेशी तरूणींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या मॉलमधील अंतरा स्पा सेंटर आणि आणखी एका स्पा सेंटरवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दहा ते बारा विदेशी मुलींना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच चार ते पाच ग्राहकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे, पोलीस उपायुक्त दीपाली घाडगे यांनी ही माहिती दिली.

प्रोझोन मॉल हा औरंगाबाद शहरातील भव्य असा मॉल आहे. या मॉलमधील स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आणि दहा ते बारा विदेशी तरूणींना ताब्यात घेतले. या तरूणी थायलँड येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपायुक्त दीपाली घाडगे यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे समजते आहे.

या मुली अल्पवयीन आहेत की नाही याची तपासणी सध्या सुरू आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या ग्राहकांची नावेही समजलेली नाहीत. मात्र हे सगळेच जण देशाबाहेरील असल्याचेही प्रथमदर्शनी दिसते आहे अशीही माहिती दीपाली घाडगे यांनी दिली. औरंगाबादमध्ये आज या धाडीचीच चर्चा चांगली रंगली आहे. प्रोझोन मॉल हा मराठवाड्यातील भव्य मॉल आहे. या मॉलच्या उद्घाटनासाठी काही सिनेसृष्टीतील काही तारे तारकांनीही हजेरी लावली होती. मात्र या मॉलमध्ये असा प्रकार उघडकीस आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते आहे.

First Published on December 7, 2017 11:02 pm

Web Title: police raid on aurangabad prozone malls spa