पोलिसांच्या कार्यक्रमाला तरुणांची गर्दी, गर्दीवर नियंत्रणासाठी सौम्य लाठीमार; तरीही तरुणांचा उत्साह कायम! काही वेळाने सुरू झालेल्या पावसात भिजतच तरुणांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.. अष्टविनायक प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय विचार मंचतर्फे कर्तृत्ववान पोलीस अधिकाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या निमित्त विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचे भाषण झाले. ते ऐकण्यास जमलेल्या तरुणांच्या गर्दीतून या उत्साहाचे दर्शन घडले.
दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहाबाहेर सुमारे २ हजारांपेक्षा अधिक तरुणाईने गर्दी केली होती. मात्र, गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांना चक्क सौम्य लाठीमार करावा लागला. परंतु पोलिसांच्या लाठय़ा खात तरुणांनी कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे ठरवले, तेव्हा आयोजकांनी मोठय़ा पडद्यावर कार्यक्रम पाहण्याची तरुणांना संधी उपलब्ध करून दिली. कार्यक्रम सुरू होताच काही वेळाने पावसाने हजेरी लावली. मात्र, तरुणांनी भिजत कार्यक्रम पाहिला.
पोलिसांच्या कार्यक्रमाला सहसा गर्दी नसते. पावसाळा असला तरी पावसाची आशा रोजच मावळलेली असते. एखाद्या कार्यक्रमाला आजचा तरुण स्वतहून गर्दी करेल, असेही फारसे घडत नाही. पण या तिन्ही बाबींना छेद देणारी घटना सोमवारी सायंकाळी लातुरात घडली. तरुणांमध्ये पोलिसांप्रती नेमके आकर्षण का आहे? याचे उत्तर या गर्दीने दिले. शहरात किमान १० हजार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची विशेष तयारी करीत आहेत. काही पदवीधर, तर काही पदवीचे शिक्षण घेतात. या परीक्षेची तयारी करताना विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ज्या जिद्दीने व परिश्रमाने परीक्षेत यश मिळविले, त्यांनाच प्रत्यक्ष पाहावे व ऐकावे या उद्देशाने हे तरुण कार्यक्रमासाठी आले होते. आजचा तरुण वाया गेला आहे, त्याला दिशा नाही, स्वप्न नाही, काही करण्याची जिद्द नाही, अशी एकांगी टीका सर्वसाधारणपणे केली जाते. ही टीका खरी की खोटी हे तुम्हीच ठरवा, याचे समर्पक उत्तरच कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या तरुणांनी दिले.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सोमवारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवा संसदेचे आयोजन केले होते. जिल्ह्य़ाच्या १० तालुक्यांतील १० महाविद्यालयांच्या पाच विद्यार्थ्यांच्या संघाने नक्षलवाद, महिलांची सुरक्षितता, व्यसनाधीनता, बालमजुरी, हुंडाबळी आदी विषयांवर यात मते मांडली. समाजातील प्रश्नांची उत्तरे शोधताना व्यवस्था, प्रशासन, राजकारण्यांना दोष देण्याऐवजी समाजातील घटकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. हक्काबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. विशेषत: तरुणांनी या साठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली.