शहर पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत पोलिसाने एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून संबंधित पोलिसाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस मुख्यालयातील जलतरण तलाव परिसरात गणेश विश्राम पाटील या पोलिसाने पाच सप्टेंबर रोजी हा प्रकार केल्याची तक्रार १६ वर्षांच्या मुलीने सोमवारी रात्री जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दिली. जलतरण तलावात अनेक मुले-मुली पोहण्यासाठी येत असतात. गणेश पाटील हा जलतरणपटू असल्याने त्याची तेथेही प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पोहण्यासाठी येणाऱ्या एका मुलीशी त्याने ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवित बलात्कार केला. या कृत्याबद्दल कोणासही काहीही न सांगण्याची तंबीही त्याने दिली होती. पीडित मुलीने धाडसाने पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द तक्रार दिली. या प्रकाराची गांभिर्याने नोंद घेत अधिकाऱ्यांनी पाटील यास ताब्यात घेत निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्यास २१ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.