फेब्रुवारी- मार्च महिन्यात झालेल्या पोलीस भरतीमध्ये गूण वाढवून देणारे रॅकेट उघड झाले आहे. या प्रकरणी सांगली येथील सॉक्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यासह वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस होण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांवर आता गुन्हे दाखल झाल्याने त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

नांदेडमध्ये फेब्रुवारी- मार्च महिन्यात ६९ जागांसाठी भरती घेण्यात आली. यामध्ये १ हजार १९८ उमेदवारांनी ही लेखी परीक्षा दिली. मात्र काही उमेवारांनी उत्तर पत्रिकेवर काहीच न लिहिता त्या तशाच कोऱ्या सोडल्या. या उत्तर पत्रिका तपासणीचे काम एसएसजी सांगली येथील कंपनीकडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणात पोलीस दलातील आयआरबी औरंगाबाद येथील नामदेव ढाकणे याने या कंपनीसोबत गुण वाढवून देण्यासाठी सलगी साधली. नांदेड येथे भरतीसाठी आलेल्या बारा विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्याची हमी त्याने घेतली होती. त्यानुसार या बारा विद्यार्थ्यांना नव्वदपेक्षा अधिक गुण हे लेखी परीक्षेत मिळवून दिले.

पडताळणी दरम्यान जालना जिल्ह्यतील देऊळगावराजा येथील सहा विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण मिळाल्याने बाब उघड झाली. तसेच यातील दोघांना सारखे गुण मिळाल्याने शंका उपस्थितीत झाली. यावरून पोलीस दलाने लेखी परीक्षेदरम्यानचे सी.सी.टी. व्ही फुटेज तपासले असता, अधिकचे गुण मिळविलेल्या उमेदवार हे पेपर न सोडवता शांत बसल्याचे दिसून आले. अखेर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. संशय आल्याने त्यांची फेरपरीक्षा झाली. यात त्या तरुणांना कमी गुण मिळाले आणि हा प्रकार उघड झाला.

तपासादरम्यान पोलीस कर्मचारी नामदेव ढाकणे, शुक्राचार्य टेकाळे, शेख आगा, शिरीष अवधूत, स्वप्नील साळुंके, प्रवीण भाटकर, दिनेश गजभारे यांच्यासह गुण वाढवून घेतलेल्या ओंकार गुरुव, कृष्णा जाधव, शिवाजी चेके, कैलास काठोडे, आकाश वाघमारे, सलीम शेख, समाधान मस्के, किरण मस्के, सुमित शिंदे, निकील अब्दुल, हनुमान भिसाडे, रामदास भालेराव, संतोष तनपुरे या उमेदवारांविरुद्ध वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. नऊ परीक्षार्थींसह बारा जणांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी असलेला नामदेव ढाकणे अद्याप फरार आहे.