लहान मुलाला क्रूरतेची वागणूक; चटकेही दिले

नगर : अनैतिक संबंधाच्या कारणातून अल्पवयीन मुलाला मारहाण करून, चटके देऊन क्रूरतेची वागणूक दिल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिसांनी महापालिकेतील तिघा अधिकाऱ्यांसह एक महिला अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही महिलाही महापालिकेतील कर्मचारी आहे.

मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ व अग्निशमन विभागाच्या सावेडी केंद्रातील बाळू घाटविसावे यासह मनपामधील एक परिचारिका असे चौघे आरोपी आहेत. या चौघांविरुद्ध भादवि ३२३, ३२४, ५०४, ५०६ सह ३४ तसेच बाल न्याय अधिनियम (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम) २०१५ चे कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका पंधरा वर्षे वयाच्या मुलाने या संदर्भात फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये या मुलाच्या आईचा समावेश आहे. फिर्यादीनुसार शंकर मिसाळ व या महिलेचे अनैतिक संबंध  आहेत. या कारणातून मिसाळ, डॉ. बोरगे, घाटविसावे या महिलेच्या घरी जात. दारू पिऊन आरडाओरडा करत. त्याचा जाब या मुलाने विचारल्याने त्याला १३ जूनला रात्री साडेअकराच्या सुमारास मारहाण केली तसेच तुला मारून टाकले तर तुझी कायमची कटकट मिटेल, अशी धमकी देऊन या मुलाचे पाय धरले व त्याला गच्चीवरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला तसेच तीन महिन्यांपूर्वी या मुलाला चटकेही देण्यात आले.

हा मुलगा या त्रासाला वैतागला असल्याने त्याने प्रथम तोफखाना पोलीस नंतर कोतवाली पोलिसाकडे येथे दाद मागितली होती. परंतु दखल न घेतल्याने या मुलाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यामुळे हे प्रकरण बाल सुरक्षा समितीकडे सोपवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला.

आयुक्तांना पदाधिकारी भेटणार

महापालिकेतील या तिघा अधिकाऱ्यांच्या कृत्यामुळे महापालिकेची बदनामी झाली आहे, त्यामुळे या तिघांविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पदाधिकारी उद्या, सोमवारी आयुक्तांची भेट घेणार  असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे व नगरसेवक महेंद्र गंधे  यांनी दिली.