22 November 2019

News Flash

तीन-तीन मंत्र्यांचा भार सुटताच ‘त्यांनी’ सोडला सुटकेचा नि:श्वास

हुश्श... सुटलो एकदाचे! बरे झाले, जिल्ह्याला गृहमंत्रीपद मिळाले नाही ते! .. काही दिवसांपर्यंत मातब्बर अशा तीन मंत्र्यांचा जिल्हा असलेल्या सांगलीतील पोलिसांनी नुकताच नि:श्वास सोडला.

| November 4, 2014 03:30 am

हुश्श. . सुटलो एकदाचे! बरे झाले, जिल्ह्याला गृहमंत्रिपद मिळाले नाही ते! … काही दिवसांपर्यंत मातब्बर अशा तीन मंत्र्यांचा जिल्हा असलेल्या सांगलीतील पोलिसांनी नुकताच नि:श्वास सोडला.  गेली पंधरा वर्षे तीन-तीन मंत्र्यांच्या दिमतीने पिचून गेलेल्या जिल्ह्य़ातील पोलिसांनी जिल्ह्य़ाला मंत्रिपद न मिळाल्याबद्दल खासगीत आभार मानले आहेत.
आघाडी सरकारच्या काळात गेली पंधरा वर्षे सांगली जिल्ह्यात आर. आर. पाटील, जयंत पाटील आणि पतंगराव कदम हे तीन मंत्री होते. हे तिघेही मंत्री वजनदार आणि त्यांच्याकडील खातीदेखील पोलिसांना पळवणारी. वर्षांतील प्रत्येक दिवशी कुठला ना कुठला मंत्री जिल्ह्य़ात प्रवेश करायचा आणि पोलिसांची धावपळ सुरू व्हायची. हे तिघेही वास्तव्यास असले तर पोलिसांवरील ताण कमालीचा वाढायचा. त्यांच्या पुढे-मागे पोलिसांच्या गाडय़ा, दिमतीला पोलीस, बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलीस या साऱ्यांमुळे जिल्ह्य़ातील सारे पोलीस दल अक्षरश: थकले होते. पतंगराव आणि जयंत पाटलांपेक्षा आबांना बंदोबस्त कायम हवा असायचा. त्यासाठी तब्बल उपनिरीक्षक दर्जाच्या चार अधिकाऱ्यांसह २० पोलिसांचा ताफा कायम दौऱ्यात ठेवला जायचा. याशिवाय सुरक्षारक्षक, प्रशिक्षित कमांडो हे वेगळेच. या साऱ्यांमुळे आबा येणार म्हटले, की जिल्ह्य़ातील पोलीस दलाची धावपळ सुरू व्हायची.
या मंत्र्यांच्या निवासस्थानी पुन्हा स्वतंत्र पोलीस बंदोबस्ताची मागणी असायची. एकटय़ा आबांच्या अंजनी येथील निवासस्थानीच कायम दोन हवालदार आणि चार पोलीस शिपायांचा बंदोबस्त लावण्याची ताकीद होती. या साऱ्यांमुळे सांगलीच्या पोलिसांना सण-उत्सव काहीही असो, त्यांच्या सुटीवर पहिले गंडातर ठरलेले असायचे. जिल्ह्य़ातील नागरिकांना आपल्या जिल्ह्य़ात तीन-तीन मंत्री असल्याचा अभिमान वाटत असला तरी जिल्ह्य़ातील पोलीस दलाला मात्र हे घाऊक मंत्रिगण त्रासदायकच झालेले होते. नुकत्याच स्थापन झालेल्या नव्या सरकारमध्ये सांगली जिल्ह्य़ाला एकही मंत्रीपद मिळाले नाही. यामुळे जनतेत, कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी व्यक्त झाली असली तरी पोलिसांनी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

First Published on November 4, 2014 3:30 am

Web Title: police relaxed due to reduce the burden in sangli
Just Now!
X