विरारमधील झा बंधू आत्महत्येप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला अनोखी शिक्षा

वसई : विरारमधील झा बंधूंच्या आत्महत्या प्रकरणात विरारमधील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या वेतनातून दरमहा १० हजार रुपये वेतनकपात करण्याची शिक्षा पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी सुनावली आहे. शेख सध्या पुण्यातील येरवडा येथे कार्यरत असून त्यांच्यावर झा बंधूंच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरारमध्ये राहाणाऱ्या विकास झा (२२) या तरुणाने ९ डिसेंबर २०१७ रोजी पोलिसांच्या अत्याचाराला कंटाळून वसई उपअधीक्षक कार्यालयात पेटवून घेत आत्महत्या केली. भावाला न्याय मिळाला नाही म्हणून त्याचा मोठा भाऊ अमित झा (३०) यानेही १७ फेब्रुवारी रोजी विषप्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास राज्य गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आला होता. फरार झालेल्या शेख यांना अटकही करण्यात आली होती.

त्यानंतर शेख जामिनावर सुटले आणि त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. सध्या ते पुण्याच्या येरवडा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करत होते. या प्रकरणात पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेश यांनी शेख यांना शिक्षा सुनावली असून त्यांच्या पगारातून दरमहा १० हजार रुपये वेतनकपात करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सलग २ वर्षे ही वेतनकपात केली जाणार आहे.

पालघर जिल्ह्यातील झा बंधू मृत्यूप्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जबाबदार असल्याने त्यांच्या वेतनातून दरमहा सलग दोन वर्षे कपात केली जाणार आहे.

-डॉ. के. व्यंकेटशन, पोलीस आयुक्त, पुणे शहर

प्रकरण काय?

विकास झा या २२ वर्षीय तरुणावर चोरी, फसवणूक आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल होते. तो राहात असलेल्या परिसरातील एका महिलेच्या तक्रारीवरून त्याच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. मात्र हे गुन्हे खोटे आहेत, असे सांगत तो पोलीस ठाण्याच चकरा मारत होता. कंटाळून त्याने पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयात जाळून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने भ्रमणध्वनीवर एक चित्रफीतही तयार केली होती. विकास झाच्या आत्महत्याप्रकरणी डहाणूच्या उपअधीक्षकांमार्फत चौकशी नेमण्यात आली होती. १६ जानेवारी रोजी त्याचा अहवाल आला आणि माजी नगरसेवकाचा मुलगा मुनाफ बलोच याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु विकासच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल झाले नव्हते. त्यामुळे वैफल्यग्रस्त झाल्याने त्याचा मोठा भाऊ अमितने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेंतर तात्काळ विरारच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांची बदली करण्यात आली. मात्र जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंतिम संस्कार करणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख आणि विकास झावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.