26 September 2020

News Flash

गोव्यातून पळवून आणलेल्या बाळाच्या आई-बाबांना पोलिसांनी घेतला शोध

चॉकलेटचे आमीष देऊन पळवले होते बाळ

प्रतिकात्मक छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : गोव्यातून अकलूजमध्ये पळवून आणलेल्या बाळाचा ताबा घेऊन अकलूज पोलिसांनी केलेल्या तपासात बाळाच्या आई-वडिलांचाही शोध घेण्यात यश मिळविले आहे. कोणताही पुरावा नसताना सुतावरून स्वर्ग गाठण्याची कामगिरी या तपासातून दिसून आली आहे.
गेल्या ९ आॕगस्ट रोजी पहाटे अकलूज येथे मार्केट यार्डाच्या परिसरात एक वृद्ध स्वतःजवळ चिमुकल्या बाळाला घेऊन थांबला होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घरात पत्नीशी भांडण झाल्यामुळे आपण बाळाला घेऊन घराबाहेर पडल्याचे कथन त्या वृध्दाने केले होते. त्याचे नाव हणमंत बाबुराव डोंबाळे (वय ६५, रा. शेळगाव, ता. इंदापूर) होते.

पोलिसांनी संशयावरून डोंबाळेच्या घरी तसेच सासरवाडीसह गावच्या सरपंचाशी संपर्क साधला असता डोंबाळे हा गेल्या १८ वर्षांपासून गावातून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी आपला खाक्या दाखविताच डोंबाळे हा सुतासारखा सरळ झाला आणि हे बाळ आपण गोव्यातील मडगाव येथून पळवून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी बाळाला पंढरपूरच्या बालकाश्रमात दाखल केले. दरम्यान, न्यायालयाने डोंबाळे यास जामिनावर मुक्त केल्यामुळे पुढील तपास अर्धवट राहात होता. तेव्हा पोलिसांनी पुन्हा वेगळ्या आरोपाखाली डोंबाळे यास अटक केली आणि तपासाची चक्रे फिरवत मडगाव गाठले. परंतु तेथे कोणत्याही पोलीस ठाण्यात बाळाच्या अपहरणाची नोंद नव्हती. त्यामुळे डोंबाळे यास पुन्हा बोलते केले असता त्याने मडगावच्या फूटपाथवर बाळाचे आई-वडील राहात होते. आपणही तेथेच बाजूला रात्री झोपत होतो, अशी माहिती कथन केली.

अकलूज पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजू नाईकवाडी व पोलीस नाईक संदेश रोकडे यांनी मडगावमध्ये जाऊन तपास केला असता तेथील जुन्या मार्केटजवळील फूटपाथवर राहणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला. त्यातून बाळाच्या आई-वडिलांचा शोध लागला. आनंद श्रेत्री (वय ३२) व त्याची पत्नी पूजा श्रेत्री (वय २८) अशी त्यांची नावे असून बाळाचे नाव राहुल असल्याचे स्पष्ट झाले. श्रेत्री दाम्पत्य गरीब असून फूटपाथवर राहून भटके जीवन जगतात. तेथेच बाजूला हणमंत डोंबाळे हा रात्री झोपायचा. गेल्या आठवड्यात रात्री त्याने बाळाला चॉकलेट देण्याचे आमीष दाखवून पळवून नेले. पुन्हा तो परत आला नाही. पोलिसांनीही हद्दीचा वाद उपस्थित केल्यामुळे श्रेत्री दाम्पत्याला पोलिसांत तक्रार दाखल करता आली नव्हती. शेवटी अकलूज पोलिसांनी या प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावला. आई-बाबांना त्यांचा अपहरण झालेला छोटा राहुल परत मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 10:26 pm

Web Title: police search for babys parents who kidnapped from goa scj 81
Next Stories
1 एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्यास मुभा
2 कुलगुरू डॉ.विलास भाले यांचा मानद कर्नल कमांडंट पदाने सन्मान
3 महाराष्ट्रात ४ लाखांहून जास्त रुग्ण करोनामुक्त, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
Just Now!
X