पपडय़ाच्या मागावर नगरचे पोलीस; चार राज्यांत धुमाकूळ; सहा हत्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीरामपूर : तीन राज्यांत धुमाकूळ घालणारा व जन्मठेपेच्या तब्बल तीन शिक्षा भोगत असताना मुलाच्या लग्नाचे निमित्त सांगून तुरुंगातून सुटीवर आलेल्या पपडय़ा उर्फ राहुल व्यंकटी काळे (वय ५०) याने तब्बल तीस जणांची टोळी बनवून कोळपेवाडी येथील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकून एकाचा खून केला. चित्रपटातील खलनायकापेक्षाही अत्यंत क्रूर असलेल्या फरार पपडय़ाचा शोध तीन राज्यांमध्ये घेतला जात आहे. त्याच्या टोळीतील सोळा जण अटकेत असून अजूनही चौदा आरोपी फरार आहेत. या टोळीचा मोक्काचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

कोळपेवाडी (ता.कोपरगाव) येथे लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानावर पपडय़ा टोळीने दरोडा टाकून तब्बल दीड किलो सोने लुटले. दुकानात सराफ श्याम सुभाष घाडगे यांच्यावर गोळीबार करुन त्यांना मारुन टाकले, तर एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नगरच्या गुन्हे शाखेची पथके पपडय़ासह त्याच्या टोळीचा शोध घेत आहेत. त्याच्या सोळा साथीदारांना पकडल्यानंतर पपडय़ाची माहिती ऐकून पोलीस अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.  दरोडा यशस्वी व्हावा, साथीदार पकडले जाऊ  नयेत म्हणून गोळीबार करुन माणूस मारणे किंवा जखमी करणे ही त्याची कार्यपद्धती आहे.

कोण आहे पपडय़ा

पपडय़ा हा मूळचा शेकत पांगरी (ता.गेवराई, जि. बीड) येथील असून १९९५ मध्ये तो सलाबतपूर (ता.नेवासे) येथे भाऊ विलास व्यंकटी काळे याच्याकडे रहाण्यास आला. राहुल व्यंकटी काळे हे त्याचे खरे नाव असून तो राहुल, महादू, गणपती, संजय, टकल्या, पवन अशी पंचवीस नावे वापरतो.  तो चोऱ्या माऱ्या करत असल्याने जातपंचायतीने त्याला बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. त्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांवर गोळीबार केला. या गोळीबारात हरसिंग भोसले नावाचा त्याचा नातेवाईक जखमी झाला होता. नेवासे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तो फरार झाला व विदर्भातील वर्धा, यवतमाळ भागात पळून गेला. त्या भागात त्याने रस्तालूट सुरु केली. पुणे—नागपूर महामार्गावर रात्री तो आरामबस पंक्चर करत असे. नंतर दरोडा टाकून प्रवाशांना लुटत असे. १९९७ मध्येच त्याला लाडखेड (ता. यवतमाळ) या पोलीस ठाण्यातील सातंगे नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाने पकडले. त्याचा राग येऊ न पोलीस ठाण्यात येऊ न सातंगे यांचा खून केला. हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले. १९९७ मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला पकडले. त्याच्याकडून सातंगे यांचे सरकारी पिस्तूलही जप्त करण्यात आले. त्याला एकूण सहा बायका आहेत. त्यापैकी लोहगाव (ता.नेवासे) येथील माहेर असलेल्या एका बायकोचा जळगाव भागात त्याने खून केला. त्याला एका बायकोने सोडले असून सध्या चार बायकांचा तो दादला आहे. त्यापैकी तीन बायका या एकमेकींच्या सख्या बहिणी आहेत. त्याचा मेव्हणा पप्या उर्फ शेंडी उर्फ प्रशांत रजनीकांत भोसले हा त्याचा उजवा हात आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पपडय़ाला बारा मुले असून दरोडय़ात सारे कु टुंब व नातेवाईक तो वापरतो.

पपडय़ा टोळीला मोक्का लावणार

पपडय़ा टोळीतील १६ दरोडेखोर पकडले असून पपडय़ासह त्याचे अन्य साथीदार लवकरच पकडण्यात येतील, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. तर पपडय़ा टोळीला मोक्का लावण्यात येणार असून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. पपडय़ाची गुन्हेगारी जगताची कुंडली जमा केली जात असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. पपडय़ाला आश्रय देणाऱ्या तसेच आर्थिक रसद पुरविणाऱ्यांनाही मोक्काच्या गुन्ह्यत आरोपी केले जाणार असल्याचे ते म्हणाले. पोलीस अधीक्षक रंजनकु मार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पपडय़ा टोळीचा बीमोड करण्याचा विडा उचलला असून अनेक पथके पपडय़ाच्या मागावर आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police searching brutal robber rahul venkati kale
First published on: 22-09-2018 at 04:36 IST