सांगलीजवळ माधवनगर कर्नाळ रोडवर एका मारूती अल्टो मोटारीतून १९ लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत गेली असून याबाबत प्राप्तिकर विभागाला कळवण्यात आले असल्याचे संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी गुरूवारी सांगितले.

शहर विभागाच्या उपअधीक्षक दीपाली काळे यांना कर्नाळ रोडवर एका मोटारीतून ५०० रूपयांच्या नोटामध्ये पैशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर श्रीमती काळे यांनी माधवनगर कर्नाळ रोडवर वाहन तपासणी सुरू केली. या वेळी माधवनगरहून कर्नाळला जात असताना मारूती अल्टो गाडीची तपासणी केली. या वाहनात ५०० रूपयांच्या चलनामध्ये १९ लाख रूपये आढळून आले.
याबाबत मारूती अल्टो चालक सुभाष चवगोंडा पाटील याच्याकडे चौकशी केली असता या रकमेबाबत समाधानकारक खुलासा त्याला करता आला नाही. ही रक्कम हळदीच्या बिलाची असल्याचे तो सांगता होता. मात्र या रकमेबाबत अधिकृत कागदपत्रे हजर करण्यास पोलिसांनी त्याला सांगितले आहे. मात्र दिवसभरात त्याला कागदपत्रे हजर करता आली नाहीत. याबाबत प्राप्तिकर विभागाला कळवण्यात आले असून मूळचा दूधगावचा असणारा सुभाष पाटील हा माधवनगरमार्गे कर्नाळला कशासाठी निघाला होता असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याआधी निफाडमध्ये गुरुवारी सकाळी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी दोन गाड्यांमधून ७३ लाखांच्या नोटा जप्त केल्या आहेत. नाशिकहून कोपरगावला जाणाऱ्या गाडीत पोलिसांना ३३ लाखांची रोख रक्कम सापडली. तर गुजरातहून वैजापूरला जाणाऱ्या दुसऱ्या गाडीत पोलिसांना ४० लाख रुपये आढळले.

मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या या दोन्ही गाड्यांमधील लोकांना रोख रकमेबद्दल कोणताही खुलासा करता आलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे पाठवले आहे. या दोन्ही गाड्या अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येते आहे.