07 March 2021

News Flash

‘पोलिसांनी राठोड यांचा बुरखा फाडावा’

दरवर्षीच्या गणेशोत्सवात नेता सुभाष चौकातच अशांतता का निर्माण होते, याचे आत्मपरीक्षण शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी करावे, तोफखाना भागातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचे पित्त

| September 11, 2013 12:15 pm

दरवर्षीच्या गणेशोत्सवात नेता सुभाष चौकातच अशांतता का निर्माण होते, याचे आत्मपरीक्षण शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी करावे, तोफखाना भागातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचे पित्त खवळले व कालच्या मिरवणुकीत पोलिसांच्या हातातील काठी हिसकावून ते शिवीगाळ करत कार्यकर्त्यांना मारहाण करत होते. खरी दहशत ही राठोड यांचीच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तणाव व गोंधळ निर्माण करून संरक्षणाचा आव आणणाऱ्या राठोड यांचा बुरखा फाडून पोलिसांनी सत्य लोकांसमोर आणावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार व शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत केले.
सोमवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीच्या पाश्र्वभूमीवर शेलार व जगताप बोलत होते. महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उत्सव शांततेत पार न पाडू देण्याचा शिवसेनेचा हा कट दिसतो, असा आरोप करून शेलार म्हणाले, की उत्सव शांततेत पार पडावा, अशीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. तणाव निर्माण झाला तर परिस्थिती शांत करण्याची कोणत्याही राजकीय नेत्यांची विशेषत: लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. हातात काठय़ा आणि दगडं घेऊन ते महापालिकेत बसणार आहेत का? दुसऱ्याला गुंड म्हणणारे लोकप्रतिनिधी गुंडगिरी करताना दिसतात, त्यामुळेच कार्यकर्ते त्यांना सोडचिठ्ठी देत आहेत. कार्यकर्ते आपल्यापासून का दुरावत आहेत याचे आत्मपरीक्षण राठोड यांनी करावे. हातात दगड व काठय़ा घेऊन ही दुरुस्ती होणार नाही.
काठी हातात घेऊन कार्यकर्त्यांना मारहाण करणे लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही, सोमवारी केवळ तोफखाना मंडळाबाबतच असा प्रकार घडला नाही, तर मिरवणुकीत त्यापूर्वी अन्य दोन मंडळांबाबतही असाच प्रकार राठोड यांनी केला. पूर्वीही नीलकमल मंडळाच्या मूर्तीवर त्यांनी दगडफेक केली होती, हा चौक म्हणजे आपल्या नावावरील जागेचा उतारा आहे, असे ‘त्यांना’ वाटते आहे, असे जगताप म्हणाले. दहशत निर्माण केली जात असल्यानेच ‘मनसे’लाही नेता सुभाष चौकात पोलीस संरक्षणात पथनाटय़ सादर करावे, लागले याकडे अविनाश घुले यांनी लक्ष वेधले.
याच परिसरातील इमारतींवरून दरवेळेस दगडफेक केली जाते, त्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या वेळीही याची काळजी घेत पोलिसांनी कडक उपाय योजावेत, परवानगी न घेता मंडप उभारल्याबद्दल राठोड यांच्यावर कारवाई करावी अशी लेखी मागणीच पोलीस प्रशासनाकडे आपण करणार असल्याचे शेलार व जगताप यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 12:15 pm

Web Title: police should be unmask of shiv sena mla anil rathod
Next Stories
1 चौघा पोलिसांसह ६ जखमी, पोलीसच झाले फिर्यादी
2 पश्चिम महाराष्ट्रावर महावितरणची कृपादृष्टी !
3 पवारांचा वार: सही करताना लोकांचा हात लकवा लागल्याप्रमाणे थरथरतो!
Just Now!
X