धर्मप्रचारकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वसई : प्रार्थनेद्वारे आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या एका धर्मप्रचारकाच्या (पास्टर) विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात जादुटोणाविरोधी कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराचा आजार बरा  करण्यासाठी हा धर्मप्रचारक प्रार्थनेसाठी बोलावत होता. मात्र चार महिने प्रार्थना करूनही आजार बरा न झाल्याने त्याने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

नालासोपारा पूर्वेच्या नागीनदास पाडा येथे राहणारा हरिओम तिवारी यास मूतखडय़ाचा आजार होता. त्याला एक धर्मप्रचारक भेटला. या प्रचारकाने ‘तुमच्य काही समस्या असतील तर आमच्या प्रार्थनेमध्ये या’, तेथे तुमच्या सर्व समस्या सोडवल्या जातील, असे सांगितले. त्यामुळे तिवारी नालासोपारा पूर्वेच्या गणेशमंदीर येथील सभागृहात होत असलेल्या प्रार्थनेसाठी जाऊ  लागला. या प्रार्थनेच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकाकडे एक महिला झोळी घेऊन येत होती. त्यामध्ये सर्वच नागरिक पैसे टाकत होते. त्याप्रमाणे तक्रारदारनेही झोळीत २० रुपये टाकत होता. प्रार्थना संपल्यावर उपस्थित नागरिकांना कुठलाही त्रास असल्यास उजव्या बाजूस येऊन विनंती अर्ज भरावे, असे सांगण्यात आले. त्यानुसार तिवारी व त्याचा मित्र हरिओम पाल रांगेत उभे राहून विनंती अर्ज भरत व्यासपीठावर गेले. यावेळी दोघांच्या पोटावर हात लावून प्रचारकाने प्रार्थना केली. यावेळी प्रचारकाने मूतखडा शस्त्रक्रिया न करता काढेन, असे सांगितले आणि पुढील प्रार्थनेसाठी बोलावले.

त्यानंतर तक्रारदार राजेश पाल व हरिओम तिवारी चार महिने नियमित प्रार्थनेसाठी जात होते. मात्र आजार बरा झाला नाही. प्रार्थनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात तिवारी यांनी तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली.  पोलिसांनी या प्रकरणी या पास्टर विरोधात महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.