पोलीस महासंचालकांकडे सादर, संख्याबळही वाढणार

गुन्हेगारीचा वाढता आलेख व नियंत्रणासाठी उपलब्ध असलेले पोलिसांचे संख्याबळ यामध्ये मोठी तफावत असल्याची दखल गृहखात्याने घेतली आहे. त्यासाठी राज्यात जिल्हानिहाय पोलीस उपविभागांचा आढावा पोलीस महासंचालकांमार्फत घेतला जात आहे. नगर जिल्ह्य़ात नव्याने सहा उपविभागीय कार्यालयांचा आणि नवीन १२ पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी दिली.

जिल्हा भौगोलिकदृष्टया मोठा आहे. गुन्हेगारीचे स्वरुप व तंत्रही बदलते, वाढते आहे. सायबर गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी गृह विभागाने सायबर पोलीस ठाण्यांची जिल्हानिहाय स्थापना केली. त्यातूनच पुढे गृह विभागाने राज्यातील जिल्हानिहाय पोलीस ठाण्यांचा आणि उपविभागीय कार्यालयांचा आढावा घेतला. त्यात वाढीव पोलीस ठाणे आणि उपविभागीय कार्यालयांचे प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी दिवाळीपूर्वी नवीन सहा उपविभागीय कार्यालये आणि १२ पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव सादर केला आहे. जिल्ह्याला सहा पोलीस उपअधीक्षकांची पर्यायाने पोलस कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढणार आहे. यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे व गुन्ह्य़ांचा निपटारा गतीने होण्यास मदत होणार आहे.

नगर शहरातील कोतवाली उपविभाग, नेवासे, शिर्डी शहर, अकोले, राहुरी, श्रीगोंदे येथे नवे सहा उपविभागीय कार्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. नगर शहरातील केडगाव उपनगरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे, सावेडी, शेवगाव उपविभागीय कार्यालयात खरवंडी कासार, बोधेगाव, शिर्र्डी ग्रामीण उपविभागीय कार्यालयांतर्गत विमानतळ, शिर्डी ग्रामीण ठाणे, अकोले उपविभागीय कार्यालयात कोतूळ व समशेरपूर, राहुरी उपविभागीय कार्यालयात देवळाली प्रवरा, कर्जत उपविभागीय कार्यालयात खर्डा, श्रीगोंदे उपविभागीय कार्यालयात मिरजगाव, नगर ग्रामीण उपविभागीय कार्यालयात टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव आहे.

सध्या नगर शहर व ग्रामीण, संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, शेवगाव, कर्जत या सात ठिकाणी उपविभागीय कार्यालये आहेत. जिल्ह्यात सायबर सेल धरून ३१ पोलीस ठाणी आहेत. जुनी सात आणि नव्याने सहा उपविभागीय कार्यालये मंजूर झाल्यास जिल्ह्यात १३ उपविभागीय कार्यालये होतील. यानुसार प्रत्येक उपविभागीय कार्यालयांतर्गत दोन ते तीन पोलीस ठाणे येतील. नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव मार्गी लागल्यास एकूण ४३ पोलीस ठाणे जिल्ह्यात होतील. नगर शहरातील केडगाव आणि सावेडी उपनगरासाठी नवीन पोलीस ठाणे मंजूर करून घेण्यासाठी विशेष पाठपुरावा करणार असल्याचे ईशू सिंधू यांनी सांगितले.

मुख्यालयाची जागा पोलिसांकडे, नव्या इमारती होणार

शहराच्या सर्जेपुरा भागात पोलीस मुख्यालय आहे, या जागेला महसूलचे नाव होते. नुकतीच ती जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधू यांच्या पाठपुराव्यामुळे ती पोलिसांकडे वर्ग झाली. यामुळे मुख्यालयात नवीन पोलीस वसाहती निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला. नव्या वसाहतीचा आराखडा तयार असून, पुढील दीड महिन्यात निविदेची कार्यवाही पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे सिंधू यांनी सांगितले. मुख्यालयातील ब्रिटिशकालीन वसाहत जीर्ण व तेथे दुरवस्था झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सिंधू यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीपूर्वी शिर्डी दौऱ्यावर होते. मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याच्या युवतीचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याचे प्रकरण त्याचवेळी गाजले होते. मुख्यमंत्र्यांनी सिंधू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या दुरवस्थेची माहिती देत जागा पोलीस अधीक्षकांच्या नावे नसल्याने मुख्यालयात काही करायचे झाल्यास परवानगीसाठी महसूलकडे जावे लागते. त्यातून बराच कालापव्य होतो, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी लगेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मुख्यालयाची जागा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्याची सूचना दिली. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनीही तत्काळ कारवाई केली. तेथील जुन्या वसाहती हटवून नव्या इमारती उभारण्यात येणार आहेत. त्याचा आराखडा मंजूर आहे. त्यावर कार्यवाही सुरू आहे, असे सिंधू यांनी सांगितले.