अलिबाग : पोलीस उपनिरीक्षकानेच सहकारी पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना अलिबाग पोलीस मुख्यालयात घडली आहे. डय़ुटी लावण्याच्या रागातून हजेरी मास्तरवर पिस्तुलाची बट मारून जखमी केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली आहे. मंगेश निगडे असे जखमी पोलीस हवालदाराचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या राखीव पोलिसांची दररोज पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार आवश्यक असेल त्याप्रमाणे नेमणूक केली जाते. यात प्रामुख्याने दररोज न्यायालयात हजर करावयाच्या कैद्यांच्या सुरक्षेचा अर्थात कैदी पार्टीचा समावेश असतो. कारागृहातून कैद्यांना न्यायालयात आणणे आणि न्यायालयातून पुन्हा कारागृहात नेऊन सोडणे हे काम या पोलिसांवर सोपविले जाते. हजेरी मास्तर याची नेमणुकीची माहिती सर्व संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देत असतो. यानुसार हजेरी मास्तर मंगेश निगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक अश्विन जाधव यांना कैदी पार्टी डय़ुटी लागल्याबाबत कळविले होते. याचा जाधव यांना राग आला.

जाधव यांना डय़ुटीची कल्पना दिल्यानंतर हजेरी मास्टर मंगेश निगडे यांनी १९ फेब्रुवारी रोजी डय़ुटी लावलेल्या पोलिसांना सोडायचे का, हे विचारण्यासाठी रात्री ८ वाजता जिल्हा डीएसीबी शाखेकडे जाण्यास निघाले होते. हिराकोट तलावाजवळ निगडे आणि त्यांचा साथीदार आले असता, पोलीस उपनिरीक्षक अश्विन जाधव यांनी त्यांना अडवून डय़ुटी लावण्याबाबत विचारणा केली. त्या वेळी निगडे यांनी सदर डय़ुटी ही वरिष्ठांच्या आदेशाने लावल्याचे सांगितले. मात्र डोक्यात राग घेऊन आलेले जाधव यांनी निगडे यांना शिवीगाळ करून आपल्याजवळील पिस्तूल काढून त्यात गोळ्या भरून तुला आता गोळ्याच घालतो असे सांगून त्यांच्या अंगावर धरले. मंगेश निगडे यांनी प्रसंगावधान राखून सदर रोखलेली पिस्तूल हाताने धरून जाधव यांना प्रतिकार केला. मात्र जाधव यांनी निगडे यांच्या डोक्यात पिस्तूलच्या बटने तीन ठिकाणी मारून जखमी करून रक्तबंबाळ केले. त्या वेळी निगडे यांच्यासोबत असलेल्या साथीदारानेही दोघांच्यातील झटापट अडविण्याचा प्रयत्न केला.

निगडे रक्तबंबाळ अवस्थेत कसेबसे तेथून पळून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांना जाऊन भेटले व सदर झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. निगडे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात याबाबतचा जबाब नोंदविला आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला गेलेला नाही. मात्र या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. दरम्यान, अश्विन जाधव हे शिवजयंतीची नेमणूक संपवून आले असताना पुन्हा त्यांना नेमणूक देण्यात आल्याने ते संतापल्याची माहिती समोर येत आहे.

‘पोलिसांमध्ये झालेले भांडण हे डय़ुटी लावण्यावरून झालेले असून या प्रकरणाबाबत खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नसून खातेनिहाय चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई संबंधित अधिकाऱ्यावर केली जाईल. तसेच मारहाण झालेले पोलीस हवालदार निगडे यांना योग्य न्याय देण्यात येईल. जेणेकरून ते भयमुक्त काम करू शकतील.’

– अनिल पारस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक