बोगस सैन्यभरती प्रकरणातील संशयिताला मदत केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी निलंबित, तर दोन उपनिरीक्षकांच्या सातारा पोलीस मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत.

सैन्यदल,नौदलात भरतीचे आमिष दाखवून भाडळी बुद्रुक (ता. फलटण) येथील आकाश काशिनाथ डांगे व बारामतीतील नितीन जाधव यांनी राज्यातील अनेक युवकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणी १९ जून रोजी आकाश व नितीन यांच्यावर भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी आकाश व नितीनला अटक केली होती. पोलीस तपासात डांगे व जाधवला संदीप बनकर, साहिल झारी व उस्मान शेख यांनी मदत केल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तेजस्वी सातपुते यांनी आकाशला मदत करणाऱ्या संदीप बनकर, उस्मान शेख यांची साताऱ्यातील पोलिस मुख्यालयात बदली केली, तर साहिल झारीला निलंबित केले.

बोगस सैन्यभरती प्रकरणी फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात आकाशच्या विरोधात अनेक तक्रार अर्ज आले होते; परंतु बनकर, शेख व झारी यांनी तक्रार अर्जांची बाहेरच विल्हेवाट लावली. जानेवारीतच आकाशचा मित्र सचिन डांगेवर गुन्हा दाखल झाला होता. तपासात आकाशचे नाव समोर आले; परंतु आकाश व त्याच्या सहकाऱ्यांनी तत्कालीन तपास अधिकाऱ्यांवरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. अखेर पुणे ग्रामीण हे प्रकरण उघडकीस आणले. या नंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती.या प्रकरणाच्या चौकशीत झारी, बनकर व शेख दोषी आढळल्याने त्यांच्यावर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कारवाई केली.