जिल्हा व परिसरात चोरी, दरोडा यांसारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना पोलीस अधीक्षक परमजितसिंग दहिया यांच्या खास मर्जीतील विशेष पथकाने आजपर्यंत कोणतीही दखलपात्र कारवाई केली नाही. विशेष म्हणजे याच पथकाच्या एकाधिकारशाहीने जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा त्रस्त झाली आहे.
जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुरुवातीच्या काळात दहिया यांनी कोणत्याही स्थितीत अवैध व्यवसाय चालणार नाही, यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे कडक निर्देश दिले होते. लोकसभा, त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात अवैध व्यवसायांना अक्षरश: ऊत आला. मटका, जुगार, पत्त्याचे क्लब खुलेआम सुरू आहेत. शहरातील विमानतळ, भाग्यनगर, शिवाजीनगर व सिडको पोलीस ठाण्यांतर्गत क्लब सध्या चच्रेत आहेत. एकीकडे अवैध व्यवसाय वाढले, तर दुसरीकडे गंभीर गुन्ह्यांच्या घटनाही वाढल्या आहेत.
गंभीर गुन्ह्यांची उकल व्हावी, या उद्देशाने पोलीस अधीक्षकांनी सहायक पोलीस अधीक्षक रोहित सावंत यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन केले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागांतर्गत हे पथक कार्यरत असले, तरी या पथकाला अधीक्षकांशिवाय जाब विचारण्याची कोणाचीही िहमत नाही. पथकात कुंडगीर, सुरेश िशदे, मेहकरकर, आढाव व पठाण हे कर्मचारी कार्यरत आहेत. गुटखा, रॉकेल, स्वस्त धान्य दुकानातील अन्नधान्य पकडणे, तसेच क्रिकेट सट्टा व अन्य अवैध व्यवसायांची फक्त माहिती घेणे व कारवाईची धमकी देऊन स्वहित साधणे एवढाच प्रकार एकूण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी हेच पथक वाशिमला गेले होते. पण तेथून रिक्त हस्ते परतले.
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात एका पत्त्याच्या क्लबवर छापा टाकण्यास गेलेल्या या पथकाला तेथील व्यावसायिकांनी अक्षरश: पिटाळून लावले. पसेही घेता आणि छापेही टाकता, अशी विचारणा पथकाला करण्यात आली. अधीक्षकांच्या मर्जीतील हे पथक असल्याने कोणत्याही पोलीस ठाण्यातील अधिकारी किंवा अन्य वरिष्ठ अधिकारी त्यांच्या मनमानीकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानतो.
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या या पथकाने एकाही गंभीर गुन्ह्याची उकल केली नाही. पथकातील काही कर्मचारी अधीक्षकांचे ‘खास’ म्हणून ओळखले जातात. मात्र, आपण स्थापन केलेल्या पथकातील कर्मचारी नक्की काय करतात? त्यांनी किती गुन्हे उघड केले? ते नियमित काय काम करतात? याची माहिती अधीक्षकांना आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे. पण हे पथक काय काम करते? याची चर्चा मात्र जिल्ह्यात रंगली आहे.