पोलिसांची भूमिका

जळगाव : शहरातील इकरा युनानी महाविद्यालयात २८ विद्यार्थ्यांची सामूहिक रॅगिंग झाल्या प्रकरणी एमआयडीसी ठाण्यात तक्रार दाखल असली तरी रॅगिंग प्रतिबंधक समितीचा रितसर अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. ज्या विद्यार्थ्यांमुळे या प्रकरणाला वाचा फुटली, त्याने इकरा महाविद्यालयातील आपला प्रवेश रद्द केला आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवासी असलेल्या मुदस्सर मुख्तार इनामदार (१९) या विद्यार्थ्यांमुळे रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला होता. त्याचे वडील गृहरक्षक समादेशक असून घडल्या प्रकाराची माहिती भ्रमणध्वनीवरून मिळाल्यानंतर त्यांनी मुलास नवी दिल्ली येथील रॅगिंग प्रतिबंधक समितीकडे मेलव्दारे तक्रार करण्यास सांगितले होते. त्यानुसार मुदस्सरने तक्रार करताच त्याची तातडीने दखल घेण्यात आली. जळगाव शहरातील महाविद्यालयाचे प्रशासन त्यामुळे खडबडून जागे झाले. संशयित विद्यार्थ्यांना तडकाफडकी महाविद्यालयातून काढण्यात आले.

उपप्राचार्य डॉ. शोएब शेख यांनी स्वत: एमआडीसी पोलीस ठाण्यात जाऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली. एकूण प्रकरणाची सखोल चौकशी करून दिल्ली येथील रॅगिंग प्रतिबंधक समिती आणि विद्यापीठाकडे त्याचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच संबंधितांवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होणार असल्याचे निश्चित आहे. दरम्यान, जळगावमधील इकरा महाविद्यालयात असलेले असुरक्षित वातावरण लक्षात घेता मुदस्सरने त्याचा प्रवेश रद्द केला आहे. इतरही अनेक विद्यार्थी घडल्या प्रकाराने भेदरले आहेत. महाविद्यालयाच्या प्रशासनाने सारवासारव करीत रॅगिंगचा प्रकार घडला तेव्हां वसतिगृहात २७ नव्हे, तर १८ विद्यार्थी होते, असा दावा केला आहे.

मोठय़ा आशेने मुलगा मुदस्सर यास जळगावच्या युनानी महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी दाखल केले होते. पहिल्याच दिवशी त्याठिकाणी रॅगिंगचा प्रकार घडल्याने मुलाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले आहे. असा प्रकार इतर विद्यार्थ्यांंच्या बाबतीत होऊ  नये म्हणून तक्रारीचा पाठपुरावा करणार आहे. आम्ही मुलाचा प्रवेश रद्द केला असला तरी संबंधित महाविद्यालयाने प्रवेश शुल्क अजूनही परत केलेले नाही.

-मुख्तार इनामदार , (तक्रारदार विद्यार्थ्यांचे वडील)