पोलीस वर्दी शिवणाऱ्या श्रद्धा महिला विकास मंडळास गेल्या पाच महिन्यांपासून देयकाची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे त्यांनी वर्दी न शिवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी पोलीस शिपाई व अधिकाऱ्यांना वर्दी शिवून घेण्यासाठी शिलाईचे काम दिलेल्या संस्थेकडे सध्या हेलपाटे मारावे लागत आहेत.
सुमारे चार लाख रुपयांचे देयक थकले असल्याने श्रद्धा महिला विकास मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यां कमल अरुण झरे यांनी पोलीस आयुक्तालयात चारपेक्षा अधिक विनंतीअर्ज केले, पण काही उपयोग झाला नाही. अखेर देय रक्कम मिळेपर्यंत वर्दी शिवून मिळणार नाही, असे पोलिसांना त्यांनी स्पष्टपणे सांगितले. निधीच्या कमतरतेमुळे देयके रखडली असल्याची कबुली पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली.
औरंगाबाद शहरात सुमारे ३ हजार २०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी व अधिकारी पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. दरवर्षी पोलिसांना एक गणवेश दिला जातो. त्याचे कापड पोलीस विभागात खरेदी केले जाते आणि स्थानिक शिंपीकाम करणाऱ्या ठेकेदाराकडून गणवेश शिवून घेतले जातात. दोन वर्षांपूर्वी श्रद्धा महिला विकास मंडळास एका वर्दीसाठी २२५ रुपये दर ठरविण्यात आला. मात्र, यातील २१ रुपये पोलीस कल्याण निधीसाठी वळते केले जातात. एका वर्दीची शिलाई २०४ रुपये पडते. गेल्या काही दिवसांपासून वर्दी शिवून दिल्यानंतरही त्याचे सुमारे चार लाख रुपयांचे देयक थकले असल्याचे श्रद्धा महिला विकास मंडळाच्या झरे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,ह्वगेल्या १० वर्षांपासून शालेय गणवेशाचे काम आम्ही करीत होतो. यात पोलिसांची वर्दी शिवण्याचे काम जून २०११ मध्ये घेतले. काम देताना दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत देयक मिळेल, असे सांगण्यात आले होते. झाले उलटेच. देयक तर मिळाले नाहीच. काही देयके कर्मचाऱ्यांनी गहाळ केली. ती पुन्हा दिली. आता या कामासाठी गृह विभागाकडे निधीच नाही, असे सांगितले जात आहे.ह्व
शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्दी शिवण्यासाठी चिठ्ठी दिली जाते. निकषानुसार वर्दी शिवणाऱ्या संस्थेकडूनच ती शिवून घ्यावी, असा दंडक असल्याने प्रत्येकजण या महिला मंडळाच्या दुकानात येतो. बीबी का मकबऱ्याच्या बाजूला हे शिलाई केंद्र आहे. त्यामुळे वाळूज, चिकलठाणा अशा दूरवरच्या पोलीस ठाण्यांतून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक हेलपाटे घालावे लागतात. नव्याने पोलीस भरती झाल्यानंतर व जुन्या कर्मचाऱ्यांना दिली जाणारी वर्दी लवकर मिळावी, यासाठी पोलीस दलातील कर्मचारीही प्रयत्न करतात. मात्र, निधीच्या समस्येमुळे अनेकांना जुन्याच वर्दीवर काम चालवावे लागते.
पोलीस आयुक्त घार्गे म्हणाले,ह्वकाही देयके प्रलंबित आहेत. कार्यालयीन खर्चातून आलेल्या रकमेतूनच वर्दीची देयकेही दिली जातात. गेल्या काही महिन्यांत निधी कमी आल्याने देयके थकीत असू शकतात. लवकरच ती काढण्याचा प्रयत्न करू. काही देयके कोषागार कार्यालयात पाठविली आहेत. लवकरच शिलाई केंद्राचे पैसे दिले जातील.
पैशाअभावी बॅंकेची नोटीस
वर्दी शिलाईचे काम मिळाल्यानंतर कमल झरे यांनी आणखी २०-२५जणींना रोजगार उपलब्ध करून दिला. नव्याने घर दुरुस्ती हाती घेतली. देयक थकल्याने शिलाईचे काम करणारे कारागीर निघून गेले. ज्या बँकेने या व्यवसायासाठी त्यांना कर्ज दिले होते, त्यांनीही आता कर्जाचा हप्ता परत करण्यासाठी नोटीस बजावली आहे. वर्दीची उधारी मिळाली की, सगळे काही नीट होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.