मोहन अटाळकर, अमरावती

काही दिवसांपूर्वी तीन गुंडांनी अचलपुरात सहायक पोलीस उपनिरीक्षकाची केलेली हत्या, त्याआधी गावठी दारू अड्डय़ावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस नाईकाची हत्या आणि अनेकदा वाहतूक पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार पाहता पोलिसांचा धाक कमी होतोय की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. अशा घटनांमुळे एकीकडे पोलिसांचे मनोबल खच्ची होत असताना उपाययोजनांची कमतरता जाणवत आहे.

गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक हवाच. त्यासाठी पोलिसांकडून कायद्याचादेखील धाक दाखविला जातोच. पण त्यातूनच अचलपुरात थेट पोलिसाची हत्या होण्याचा प्रसंग घडला. एका हॉटेलसमोर रात्री उशिरा मद्यपी गुंडांचे एक टोळके गस्तीवरील पोलीस पथकाला दिसले. पोलिसांनी त्यांना चांगलाच दम दिला होता. या रागातून त्यांनी नंतर या पोलिसांना शोधण्यास सुरुवात केली. पण त्या वेळी सेवा आटोपून घरी परत जात असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल पटेल त्यांना एकटेच दिसले. गुंडांनी सळईने त्यांच्यावर वार करताना क्रौर्याची परिसीमा गाठली. या घटनेत शांतीलाल पटेल यांचा हकनाक बळी गेला.

या घटनेमागे कारण कोणतेही असले तरी पोलिसाचा जीव घेण्यापर्यंत गुंडांची मजल पोहोचतेच कशी, हा सवाल अनेकांना भेडसावू लागला आहे. अचलपूर-परतवाडा हे जुळे शहर सर्वच बाबतीत संवेदनशील मानले जाते. शहराला लागूनच मध्य प्रदेशची सीमा आहे. गुटख्यापासून अमली पदार्थाच्या तस्करी करणाऱ्यांचा सुखेनैव संचार सुरू आहे. मद्याची रेलचेल आणि गुंडांना पोषक वातावरण तयार झाल्यास गुन्हेगारीचा आलेख सहजपणे वाढतो. पोलिसांचा भर मात्र थातूरमातूर कारवाई करण्यावर आहे. गुंडांना संरक्षण देणारी व्यवस्था उभी झाल्यास त्याचे किती वाईट परिणाम दिसून येतात, हे या जुळ्या शहराने अनुभवले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केले जाणारे उपाय मात्र तोकडे आहेत.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तास सेवेवर असलेले पोलीसच सुरक्षित नसल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथील भटक्या समुदायाच्या वस्तीतील गावठी दारू अड्डय़ावर छापा टाकण्यासाठी दोन पोलीस कर्मचारी गेले होते. अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर ते परत येत असताना दबा धरून बसलेल्या दारूमाफियांनी पोलिसांवर हल्ला चढवला. यात पोलीस नाईक सतीश मडावी यांचा मृत्यू झाला होता, तर सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव हे गंभीररीत्या जखमी झाले होते. अशा घटनांमुळे गुन्हेगारांवर जरब बसवणारी वर्दीच धास्तावली असून सर्वसामान्य जनतेच्या रखवाल्यांचेच संरक्षण आता कोण करणार, हा मुद्दा उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये हॉटेल, ढाबे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. सराईत गुन्हेगार याच ठिकाणांचा आश्रय घेतात. दारू आणि अमली पदार्थाच्या नशेत धुमाकूळ घालत असतात. याच ठिकाणांहून अवैधरीत्या दारू आणि गांजाची विक्री केली जाते. गुन्ह्याच्या अनेक घटनांचे स्रोत ही ठिकाणे ठरत असताना पोलिसांना मात्र त्यावर अंकुश ठेवता आलेला नाही. काही शहरांमध्ये पोलीस निरीक्षक कडक असले तर रात्री सामसूम असते. अन्य ठिकाणी मात्र रात्रभर मोकळीक असल्याचे दिसते. यातून मग हप्तेबाजी, आर्थिक हितसंबंधांची चर्चादेखील सुरू होते.

गुन्हेगारीला, समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यापासून रस्त्यावर वाहतुकीचे नियमन करण्यापर्यंतच्या अनेक कामांत पोलीस आणि नागरिक यांचा थेट संबंध येत असतो. अशा वेळी अनेकदा नागरिकांचे पोलिसांशी खटके उडतात, पण खाकीवर हात उचलण्याची हिंमत कुणाची होत नव्हती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र बदलत असून पोलीस वर्दीचा धाक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी गुन्हेगारी टोळ्या असलेल्या वस्त्या आहेत. अशा वस्तींमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना नेहमीच तेथील रहिवाशांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागतो. पोलिसांच्या बाजूने कायदा सक्षम नसल्यानेच वर्दीवर हल्ले वाढले असल्याची खंत खुद्द पोलीस कर्मचारी व्यक्त करताना दिसतात. पोलिसांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदे कागदोपत्री आहेत. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना जामीन मिळणार नाही याचीही तरतूद करण्यात आली आहे, मात्र तरीही पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना वाढतच आहेत. वाहतूक पोलिसांचा नागरिकांशी सर्वाधिक संपर्क येत असल्याने अनेकदा विसंवादाचे प्रसंग ओढावतात. अनेक वेळा आपल्यावर का कारवाई होतेय या विचाराने वाहनचालक संतापतात आणि हल्ला करतात. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांची तपासणी करताना असे प्रकार सर्वाधिक घडतात. सुरुवातीला बाचाबाची, मग शिवीगाळ आणि मग थेट मारहाणीपर्यंत मजल पोहोचते. अशा घटना किरकोळ ठरवून त्याकडे दुर्लक्षही केले जाते. पण गेल्या तीन महिन्यांमध्ये दोन पोलिसांच्या हत्येच्या घटनांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

पुढील काळात जिल्ह्यात रात्रीच्या गस्तीवरील प्रत्येक पोलिसाकडे शस्त्र देण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झळके यांनी घेतला आहे. शक्यतो रात्रगस्त एकटय़ा पोलिसाने न घालता गटाने करण्यात यावी, अशाही सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. यामुळे गुन्हेगारांचे हल्ले रोखता येतील, पण मुळात गुन्हेगारांना मोकळे रान मिळू नये, यासाठी त्यांना मिळणारी रसद बंद करण्यासंदर्भात पोलीसप्रमुखांना कठोर अशा उपाययोजना कराव्या लागणार आहेत.