उद्योजक सुरेश धुरपते यांच्या ५५ लाखांच्या रोकड चोरीप्रकरणी मोटारीचा चालक धनंजय उर्फ धोंडीभाऊ शिवाजी नरसाळे, रा. गोरेगांव, ता. पारनेर व त्याचा साथीदार दाउद समशोद्दीन शेख वय २४ रा. कोरेगाव चिखली. ता. श्रीगोंदा या दोघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस  कोठडी दिली आहे. या गुन्ह्य़ात चालकासह आठ आरोपींचा समावेश असून उर्वरित सहा जणांच्या मागावर पोलिस आहेत.

धुरपते यांनी मुंबई येथून रोकड ताब्यात घेतल्यानंतर चालक धनंजय याने त्याच्याजवळील दुसऱ्या मोबाईलवरून दाउद शेख व इतरांशी संपर्क करून मोठी रोकड घेऊन गावाकडे येत असल्याची माहिती दिली होती. पारनेरजवळ आल्यानंतर बेलवंडी फाटा येथे पोटात कळ आल्याचा बहाणा करून स्वच्छतागृहात जाऊन धनंजय याने पुन्हा साथीदारांशी संपर्क साधला. धुरपते यांना बंगल्यावर सोडून नेहमीचे ठिकाण सोडून संरक्षक भिंतीच्या कडेला मोटार लावून धनंजय आपल्या गोरेगाव येथील आपल्या घरी धुरपते यांची दुचाकी घेऊन गेला. दरम्यान, नेहमीच्या सवईप्रमाणे धुरपते यांनी जवळची रोकड मोटारीतच ठेवली होती. नेहमी रोकड मोटारीतच असते याची कल्पना धनंजय यास होती. धुरपते यांचे घर सोडल्यानंतर धनंजय याने साथीदारांशी पुन्हा संपर्क करून मोटार कोठे लावली आहे, रोकड कोणत्या सिटजवळ आहे, कोणत्या बाजूची काच फोडून दरवाजा उघडावा याची माहिती दिली.

धनंजय याने दिलेल्या माहितीनुसार एक स्कॉर्पीओ (R. एम. एच. 12 6607) व एका विना क्रमांकाच्या स्विफ्ट मधून धनंजय याचे सात साथीदार धुरपते यांच्या बंगल्याजवळ आले. स्विफटमधील तिघांपैकी  दोघांनी संरक्षक भिंतीवरून उडया मारून आत प्रवेश केला. मोटारीची काच फोडून दरवाजा उघडीत रोकड असलेली बॅग ताब्यात घेऊन बाहेर उभ्या असलेल्या तिसऱ्या साथीदाराकडे ती सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर दोघे भिंतीवरून उडया मारून तिघेही स्विफटमधून पसार झाले. काच फोडल्याचा आवाज व त्यापाठोपाठ दार उघडल्यामुळे मोटारीचा सायरन वाजू लागल्याने धुरपते, त्यांचे वडील, भाऊ व बहीण  बंगल्याबाहेर आले. त्या वेळी दोघांना उडया मारून बाहेर जाताना त्यांनी पाहिले.

स्विफट कारमधील तिघे रोकड हस्तगत करीत असताना आवाज झाल्याने स्कॉर्पीओमधील चौघे तेथून पसार झाले. पुढे जाउन स्विफट कारची वाट पाहत  ते थांबले. स्विफट कारमधील तिघे मात्र कोणाचीही वाट न पाहता नगर कल्याण मार्गावरून बायपासने राहुरी व तेथून देवळाली प्रवरा येथे पोहचले. स्कॉर्पीओ मधील चौघांनी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांना देवळाली येथे बोलविण्यात आले.

फरारी आरोपींना पकडणार

भल्या पहाटे सातही जणांनी पैशांची वाटणी करून प्रत्येक जण पसार झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे. दरम्यान पोलिस उर्वरित आरोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दाउद शेख याच्याकडून साडेतीन लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.