गडचिरोली जिल्ह्य़ातील घटना; माजी आमदार अत्राम यांचा अंगरक्षक शहीद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचा कार्यक्रम सुरू असतांना नक्षलवादी अतिरेक्यांनी गुरुवारी दिवसाढवळ्या केलेल्या हल्ल्यात अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम यांचे अंगरक्षक नानाजी नागोसे (४५) मृत्युमुखी पडले. ही घटना अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलीस ठाण्याजवळच्या छल्लेवाडा येथे घडली.
छल्लेवाडा येथील या कार्यक्रमाला माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम सभापती अजय कंकडालवा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात आत्राम भाषण देत असतानाच त्यांचे अंगरक्षक नागोसे हे बाजूला पाणी पिण्यासाठी गेले असता साध्या वेशातील नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व ते जंगलाच्या दिशेने पळून गेले. यानंतर पोलिसांनी रेपनपल्ली येथून हेलिकॉप्टरने नानाजी नागोसे यांना गडचिरोलीच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात आणले, परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून आत्राम यांचे अंगरक्षक असलेले नागोसे हे प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात हवालदार होते. त्यांच्यावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सूरजागडवरून आंदोलन
सूरजागड येथील लॉयड मेटल्स कंपनीची लिज रद्द करावी अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस, राष्ट्रवादी, नाविस, बसप, मनसे या पक्षांनी दिला आहे. विशेष म्हणजे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या आणि हा निर्णय घेणाऱ्या भाजप व शिवसेनेचे स्थानिक नेतेही या आंदोलनात असल्याने वरून निर्णय घ्यायचा आणि स्थानिक पातळीवर विरोध दर्शवायचा, या दुटप्पी खेळीचेही दर्शन होत आहे. राज्य व केंद्र सरकारने सूरजागड किंवा परिसरात लोहउद्योग सुरू करून नंतरच येथील खनिज संपत्ती इतरत्र न्यावी, अशीही भूमिका आंदोलक नेत्यांनी घेतली आहे.