30 May 2020

News Flash

नाव पक्षाचे, राजकारण मात्र आघाडय़ांचे!

या उलट-सुलट राजकीय हालचालींनी या आठही संस्थांमध्ये निवडणूक चुरशीची बनली आहे.

सोयीनुसार नगर जिल्ह्य़ात राजकीय आघाडय़ा

राजकीयदृष्टय़ा संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्य़ातील नगरपालिका निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक नेता सुभा आपल्या ताब्यात राहील यासाठी प्रयत्नशील असून, पक्षीय राजकारणात सोयीनुसार आघाडय़ांना महत्त्व आले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये लढती होत असून, तुलनेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची पीछेहाट होईल, असे चित्र आहे.

जिल्ह्य़ातील श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी या नगरपालिका आणि शिर्डी नगरपंचायत या आठ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रविवारी होत आहे. स्थानिक आघाडय़ा आणि तालुकानिहाय बदलती राजकीय गणिते यामुळे सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पक्षीय मोडतोड झाली आहे. श्रीरामपूर येथे काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना असे एकत्रित आले आहे, तर संगमनेर येथे सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले असून भाजप-शिवसेना युतीला येथे हरताळ फासला आहे. कोपरगाव येथे भाजपला प्रभावी बंडखोरीचा सामना करावा लागतो आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या मतदारसंघात (पाथर्डी) राष्ट्रवादीला पक्षाचे चिन्ह सोडून आघाडीचा आधार घ्यावा लागला. माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा बाजूला सारून आघाडी रिंगणात उतरवली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विखे व भाजपचे शिवाजी कर्डिले एकत्र आले आहेत, तर याच तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपालिकेत मात्र विखे-कर्डिले परस्परांचे विरोधक आहेत.

या उलट-सुलट राजकीय हालचालींनी या आठही संस्थांमध्ये निवडणूक चुरशीची बनली आहे. अपवाद वगळता सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्षासाठी तरुण उमेदवाराला संधी दिल्याने या निवडणुकीत तुलनेने तरुणांचा उत्साह लक्षणीय आहे. मात्र संगमनेर, श्रीरामपूर, राहुरीसह बहुसंख्य ठिकाणी या निवडणुकीला नातेगोत्याचे परिमाण लाभले असून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना घरातील उमेदवारच पुढे करावा लागला आहे.

संगमनेर व श्रीरामपूर वगळता अन्य नगरपालिकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे नागरी समस्या मोठय़ा आहेत. मात्र या निवडणुकीत असे मुद्दे तोंडी लावण्यापुरतेच ठरले असून व्यक्तिगत संबंधांना अधिक महत्त्व आले आहे.

कोपरगाव येथे विजय वहाडणे यांची नगराध्यक्ष निवडणुकीतील बंडखोरी भाजपला अडचणीची ठरू शकते. मात्र येथे काळे-कोल्हे असाच पारंपरिक सामना रंगला आहे. त्यातही भावी राजकारणाचीच गणिते डोळ्यासमोर ठेवून उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. श्रीरामपूर येथे पुन्हा ससाणे (काँग्रेस)-आदिक (राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना महाआघाडी) असाच सामना चुरशीचा बनला असून त्याकडे जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांच्या पत्नी व विद्यमान नगराध्यक्ष राजश्री ससाणे व दिवंगत ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक यांच्या नगराध्यक्षपदाच्या लढतीला जिल्ह्य़ात विशेष महत्त्व आहे. यानिमित्ताने आदिक यांच्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीने प्रथमच निवडणुकीत उडी घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2016 1:30 am

Web Title: political alliance in nagar district
Next Stories
1 कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचा उलटा प्रवास
2 चंद्रपूर जिल्हा बँकेची २५ लाखांवर बोळवण!
3 आ. जयकुमार गोरेंवर विनयभंगाचा गुन्हा
Just Now!
X