मोहन अटाळकर

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही या वेळी राजकीय पक्षांच्या थेट प्रवेशाने रंगतदार ठरली आहे. शिक्षक संघटनांची राजकीय बांधिलकी प्रत्येक निवडणुकांमध्ये दिसून आली खरी, पण सुप्तावस्थेतील या भूमिकांचे रूपांतर आता सरळ राजकीय आखाडय़ात होत असल्याने मतदारही संभ्रमावस्थेत सापडले आहेत.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्यात परंपरागत लढती पाहायला मिळाल्या. गेल्या निवडणुकीने या व्यवस्थेला छेद दिला. शिवसेनेचे स्थानिक नेते प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅड. अरुण शेळके यांचा ४ हजार ९४२ मतांनी पराभव केला होता. गेल्या वेळी ‘नुटा’ आणि ‘विज्युक्टा’ या दोन प्रमुख संघटनांनी कोणत्याही उमेदवाराला समर्थन देण्याऐवजी सदसद्विवेकबुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले होते. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातील दुफळीने तत्कालीन आमदार वसंत खोटरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. ‘नुटा’चे समर्थन मिळवण्यात ते यशस्वी होऊ शकले नव्हते. दुसरीकडे अरुण शेळके यांनी ‘सुक्टा’ आणि प्राचार्य फोरमसारख्या अनेक संघटनांचा पाठिंबा मिळवला खरा, पण शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी निवडणूक लढवणे हे अनेकांना रुचलेले नव्हते.

पण, या वेळी शिक्षक संघटनांच्या भूमिका दुय्यम ठरतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजप विरुद्ध शिवसेना (महाविकास आघाडी) असा सामना या वेळी रंगणार आहे. विविध शिक्षक संघटनांचे उमेदवार रिंगणात असले, तरी त्यांना शिक्षक मतदार कसा प्रतिसाद देतात, यावर निवडणुकीचे चित्र ठरणार आहे.

१९८० पूर्वी अमरावती आणि नागपूर विभाग मिळून एक शिक्षक मतदारसंघ अस्तित्वात होता. त्या वेळी मराशिपचे गणपतराव वैद्य आणि त्यानंतर चिखलीचे नानासाहेब लंके यांना मतदारांनी संधी दिली होती. १९८३ मध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ अस्तित्वात आला. विमाशिचे बाबासाहेब सोमवंशी हे पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर १९९० मध्ये मराशिपने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचला. त्या वेळी वसंतराव मालधुरे हे विजयी झाले. १९९६ मध्ये मराशिपचे दिवाकरराव पांडे आमदार झाले. त्यानंतर २००२ मध्ये विमाशिचे वसंतराव खोटरे विजयी झाले.  य २००८ मध्ये वसंतराव खोटरे पुन्हा निवडून आले, पण त्यानंतर २०१४ मध्ये मूळचे शिवसैनिक असलेले श्रीकांत देशपांडे यांना मतदारांनी संधी दिली, हा इतिहास आहे.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, लोकभारती, विज्युक्टा, शिक्षक महासंघ, शिक्षण संघर्ष संघटना, अमरावती विभागीय शिक्षक संघ, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र शिक्षक आघाडी, शिक्षक क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण महासंघ अशा अनेक संघटनांचे उमेदवार प्रचाराला लागले आहेत, पण पहिल्या पसंतीच्या मतांना आपल्याकडे वळवणे हे या उमेदवारांसमोरील मोठे आव्हान आहे. राजकीय पक्षाच्या व्यासपीठाचा आधार घेऊन मतदारापर्यंत पोहोचणे सोपे असते. त्यामुळेच या वेळी थेट राजकीय पक्षच मैदानात उतरले आहेत. विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा सामना भाजपचे डॉ. नितीन धांडे यांच्यासोबत आहे. इतर अनेक उमेदवार आपली क्षमता दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाविकास आघाडीने अमरावतीची जागा शिवसेनेला दिली. त्यामुळे आता भाजप विरूद्ध शिवसेना अशी लढत दिसेल.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आजवर लढा दिला. महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्ष आता सोबत आहेत. मुळात आपण शिवसैनिक आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यासोबतच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा, निर्णय प्रक्रियेत सहभाग यामुळे शिक्षकांचा पाठिंबा आपल्याला मिळाला. या वेळी महाविकास आघाडीने आपल्याला उमेदवारी बहाल करून जो विश्वास दर्शवला तो सार्थ ठरविण्याचा आपण प्रयत्न करू. गेल्या निवडणुकीपेक्षाही जास्त मतांच्या फरकाने आपण निवडून येऊ.

– प्रा. श्रीकांत देशपांडे, उमेदवार, महाविकास आघाडी</p>

गेल्या अठरा वर्षांपासून शिक्षकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. सरकारचे अजूनही त्याकडे दुर्लक्ष आहे. भाजपने शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आजवर लढा दिला. आपणही त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. भाजपच्या पक्षसंघटनात्मक बांधणीचा लाभ आपल्याला मिळेल. केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि राज्यातही भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे. मतदार हे शिक्षक संघटनांच्या राजकारणाला कंटाळले आहेत.

– डॉ. नितीन धांडे, उमेदवार, भाजप