आसिफ शेख यांचा आरोप

मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघातंर्गत बहुचर्चित मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात यावेळी घसरलेल्या मतदानाच्या टक्क्य़ाचे खापर काँग्रेसने प्रशासनावर फोडले आहे. अल्पसंख्यांकाचे शहर म्हणून ओळख असलेल्या या शहरातून काँग्रेसला जास्त आघाडी मिळू नये, म्हणून राजकीय षडयंत्र रचण्यात आले आणि त्यास प्रशासन बळी पडले, असा आरोप करत या मतदारसंघात फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत केली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदार संघातून भाजपचे डॉ. सुभाष भामरे हे विजयी झाले असतांना मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात मात्र प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अमरिश पटेल यांनी एक लाख २७ हजार अशी घसघशीत आघाडी घेतली होती. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार आसिफ शेख, महापौर शेख रशीद यांच्यासह राष्ट्रवादीचे मौलाना मुफ्ती ईस्माइल, जनता दलाचे बुलंद एकबाल अशा सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र येत काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांना साथ दिली. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत शहरातून काँग्रेसला किती आघाडी मिळू शकते, याबद्दल प्रारंभापासून उत्कंठा निर्माण झाली आहे. मात्र यावेळी शहरातील मतदानाचा घसरलेला टक्का काँग्रेसच्या छावणीत काहीसा चिंता निर्माण करणारा ठरला असून त्याबद्दल काँग्रेसने प्रशासनाला दोषी धरले आहे. गेल्यावेळी येथे ५७ टक्के झालेले मतदान यावेळी ५० टक्क्य़ांपर्यंत घसरले.

आमदार आसिफ शेख यांनी सायंकाळी येथील उर्दु मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सोमवारी मतदानाच्या दिवशी  प्रशासनाकडून शहरात लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य घडले असून लोकांना येनकेनप्रकारे मतदानापासून वंचित ठेवले गेल्याचा आरोप केला आहे. सायंकाळी सहा या विहित वेळेत मतदान केंद्र आवारात येऊनही दडपशाही करत पोलिसांनी अनेकांना केंद्राबाहेर हुसकावून लावले, अनेक मतदारांची नावे यादीतून गायब करण्यात आली. दूरच्या किंवा अडचणीच्या ठरतील अशा केंद्रांमध्ये नावे अंतर्भूत केल्याचे आढळून आले. काही ठिकाणी वरच्या मजल्यावर केलेल्या व्यवस्थेमुळे अपंग, वृध्द मतदारांची अडचण झाली, असा तक्रारींचा सूर शेख यांनी लावला. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपण लेखी तक्रार केली असून फेरमतदान घेण्याची मागणी केल्याचे शेख यांनी नमूद केले आहे.

देशातील संविधान, लोकशाही वाचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर बंदी आणावी, या मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी अशोकस्तंभ परिसरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. इव्हीएमच्या माध्यमातून झालेली निवडणूक पारदर्शक होऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्येक इव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्र जोडणे आवश्यक असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यात व्हीव्हीपॅटमधील सर्व चिठ्ठय़ांची मोजणी न करता केवळ पाच टक्के चिट्टय़ा मोजण्यात याव्यात, असे म्हटले आहे. याबाबत २३ राजकीय पक्षांनी याचिका दाखल केली होती. यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येणे शक्य नसल्याची तक्रार करत बहुजन क्रांती मोर्चाने इव्हीएम यंत्र बंद करून कागदी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी अशोक स्तंभ परिसरात जेलभरो आंदोलन केले.

आंदोलनात अ‍ॅड. सुजाता यांच्यासह राजीव खरे, संतोष वाघमारे, सचिन तोरणे यांच्यासह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आदी भागातून पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.