महापालिका बरखास्तीची मागणी करणारे राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असताना काय अवस्था होती असा सवाल काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम यांनी शनिवारी जत येथे उपस्थित केला. जयंत पाटील यांच्या टिपणीनंतर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून मदन पाटील यांनी सांगलीत बगलबच्चे उरले नसल्याने अशी मागणी केल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला पालिकेतील गटनेते जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
विधानसभेत शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी गॅस्ट्रोच्या साथीबाबत लक्षवेधी मांडली होती. यावर चच्रेवेळी जयंत पाटील यांनी गॅस्ट्रोला जबाबदार धरून महापालिका बरखास्त करणार का असा सवाल उपस्थित केला होता. या त्यांच्या विधानावर पुन्हा सांगलीत राजकीय धूळवड उडाली असून काँग्रेसच्या नेत्यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
ज्येष्ठ नेते डॉ. कदम यांनी महापालिकेत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती त्यावेळी शहराची काय अवस्था होती असा सवाल करून हा कांगावा सांगलीच्या प्रेमापोटी नसून हे बोलणे केवळ राजकीय लाभापोटी आहे. त्यांच्याकडे सत्ता होती, त्यावेळी कोणता विकास साध्य झाला असा सवाल केला. बरखास्त करून प्रश्न सुटत नसतात. प्रश्न सोडविण्यासाठीची भावना आवश्यक आहे.
यावर सत्ताधारी काँग्रेसचे नेते मदन पाटील म्हणाले की, महापालिकेत जयंत पाटील यांचे कार्यकत्रे उरले नसल्याने त्यांना बरखास्त करण्याची इच्छा झालेली दिसत आहे. साथीचे निमित्त साधून राजकीय भूमिका घेणे म्हणजे राजकीय परिपक्वपणा म्हणता येणार नाही.
गटनेते किशोर जामदार यांनीही पालिका बरखास्तीच्या मागणीबाबत खरपूस समाचार घेताना सांगितले की, हे पाप महाआघाडीचे असून ग्रामीण भागातही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेला बरखास्त करण्याचा नियम जिल्हा परिषदेला का लावण्यात येऊ नये असा सवाल उपस्थित केला.